उस्मानाबाद : जिल्हा कोषागार कार्यालयाकडे सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन, कामांची बिले आदी जबाबदाऱ्या असतानाच मागील काही महिन्यांपासून वैद्यकीय गट विम्यासारख्या महत्वाच्या योजनांची अंमलबजावणीही सोपविण्यात आली आहे. असे असतानाच दुसरीकडे या कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या तब्बल २५ जागा रिक्त आहेत. त्यामुळे आहे त्या कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा भार पडत आहे.कोषागार कार्यालयाला जिल्ह्याचा कणा मानले जाते. या कार्यालयाच्या माध्यमातून शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन, सेवानिवृत्तांची पेन्शन, मुद्रांक साठा आणि वितरण, नवीन निवृत्ती वेतन, कुटुंब निवृत्ती वेतन आणि नव्याने सुरू झालेल्या वैद्यकीय गट विमा योजनेची अंमलबजावणी याच कार्यालयाकडे सोपविण्यात आली आहे. कार्यालयाकडील कामाचा व्याप ज्या गतीने वाढत चालला आहे, त्या गतीने अधिकारी व कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरली जात नाहीत. त्यामुळे आहे त्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढत आहे. याचा परिणाम कार्यालयीन कामाच्या गतीवर होत आहे. अप्पर कोषागार अधिकाऱ्याची तिन्ही पदे रिक्त आहेत. लोहारा येथील उपकोषागार अधिकाऱ्याचे पद जून २०१३ पासून रिक्त आहे. जवळपास एक वर्ष लोटले तरी या ठिकाणी नियमित अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आलेली नाही. वाशी येथील कार्यालयाची अवस्था तर अत्यंत बिकट आहे. हे कार्यालय कार्यान्वित झाल्यापासून येथे उपकोषागार अधिकारीच नाही. त्यामुळे या दोन्ही कार्यालयाचे कामकाज जिल्हास्तरावरून चालविण्याची वेळ वरिष्ठ अधिकाऱ्यांवर ओढावली आहे. वरिष्ठ लिपीक आणि कनिष्ठ लेखापाल यांची सरळ सेवा आणि पदोन्नतीने भरावयाची. प्रत्येकी एक या प्रमाणे दोन पदे मार्च २०१४ पासून रिक्त आहेत. कनिष्ठ लिपीक आणि लेखापाल यांची नऊ सरळसेवा अणि ६ पदोन्नतीने अशा एकूण १५ जागा रिकाम्या आहेत. शिपाई अणि पहारेकऱ्यांची अनुक्रमे २ व १ अशी तीन पदे रिक्त आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने कोषागार कार्यालयाच्या कामकाजावर परिणाम होत आहे. ही पदे तातडीने भरण्यात यावीत, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)
‘कोषागार’मध्ये रिक्त जागांचा प्रश्न
By admin | Updated: July 27, 2014 01:14 IST