संजय कुलकर्णी , जालनाजिल्ह्यातील मग्रारोहयोअंतर्गत चार हजार अपूर्ण विहिरींच्या कामांचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून शासनाने ही कामे पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यासाठी तीन कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार असून मार्चपूर्वी सुमारे चारशे तर उर्वरित कामे जूनपर्यंत पूर्ण होतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.गेल्या अनेक दिवसांपासून जिल्हा परिषदेअंतर्गत ग्रामीण भागात मग्रारोहयोतून सिंचन विहिरींची जी कामे हाती घेण्यात आली, त्यापैकी चार हजार कामे अपूर्ण आहेत. कुशल कामांची देयके मोठ्या प्रमाणावर प्रलंबित आहेत. याविषयीचा मुद्दा जिल्हा परिषदेच्या स्थायी व सर्वसाधारण सभांमधूनही चर्चिला गेला होता. लाभधारकांना तातडीने पेमेंट मिळावे व सिंचन सुविधा वाढवावी, या उद्देशाने सिंचन विहिरींची कामे पूर्ण करण्यासाठी शासनाने अतिरिक्त सूचना दिल्या आहेत. आर्थिकदृष्ट्या ७५ टक्के पूर्ण असलेल्या विहिरींच्या कामांना प्राधान्य देण्यात येणार असून त्यानंतर उर्वरीत विहिरींची कामे पूर्ण केली जाणार आहेत. पात्रतेचे निकष शिथिल करण्यात आले आहेत. यामध्ये ५ पोलच्या आत विद्युत पुरवठा असावा ही अट शिथिल करण्यात आली आहे. तथापि ५ पोलच्या आत विद्युतपुरवठा उपलब्ध नसल्यास संबंधित लाभधारक त्याची जमीन डिझेल इंजिन किंवा सोलार इंजिनच्या सहाय्याने सिंचित करेल व त्यावरील खर्चाची जबाबदारी संबंधित लाभधारकाची राहिल, असे हमीपत्र संबंधित लाभधारकाकडून लिहून घेण्यात येणार आहे. (क्रमश:)
अपूर्ण विहिरींचा प्रश्न मार्गी
By admin | Updated: March 27, 2015 00:27 IST