औरंगाबाद : ६ कोटींचे विनानिविदा सॉफ्टवेअर खरेदी करण्याचा डाव उधळला गेल्यानंतर विद्यापीठातील सॉफ्टवेअरच्या भाड्यातील गोंधळाचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. ६ कोटींचे सॉफ्टवेअर खरेदीची वर्कआॅर्डर ज्या नागपूर येथील निर्मल कंपनीला देण्यात आली होती, त्याच कंपनीला विद्यापीठ सध्या सॉफ्टवेअरचे महिना २ लाख ५२ हजारांचे बिल अदा करीत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडून सुमारे चार वर्षांपासून निर्मल कंपनीला महिन्याकाठी सुमारे अडीच लाख रुपयांची रक्कम दिली जात असल्याची माहिती आहे. दरम्यान, ६ कोटींची विनानिविदा निर्मल कंपनीला वर्कआॅर्डर देण्यामागे कुलगुरूंवर काही मंडळींनी दबाव आणला असल्याचे चर्चिले जात आहे. सरकार पक्षामध्ये असणारी ही मंडळी सातत्याने कुलगुरूंवर बारकोड उत्तरपत्रिका खरेदी प्रकरणाची टांगती तलवार ठेवून नियमबाह्य कामे करण्यास भाग पाडत असल्याचे चित्र आहे. ६ कोटींची निविदा निर्मल कंपनीला देण्यामागेही याच मंडळींनी दबाव आणल्याची चर्चा आहे. शिवाय आर्थिक कारभार सांभाळणारे अधिकारीही या प्रकारात सामील झाल्याचे स्पष्ट होत आहे.
विनानिविदा खरेदी; कुलगुरूंवर दबाव
By admin | Updated: May 20, 2016 00:38 IST