शिरीष शिंदे , बीडराष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने सत्ता स्थापन झाल्यानंतर केंद्रामध्ये आज आपला पहिला रेल्वे अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात नगर-बीड-परळी रेल्वे मार्गासाठी केवळ २० कोटींची तरतूद केली असल्याने बीड जिल्हावासियांना रेल्वेसाठी पुन्हा व्यापक आंदोलन उभे करावे लागणार आहे. बीड रेल्वे निधीसाठी मोठी आर्थिक तरतूद केली जाईल ही अपेक्षा दिवसाअखेर फोल ठरली, हा दिवस बीड वासियांसाठी वाईट दिवस ठरला. रेल्वे अर्थ संकल्पाविषयी बोलताना बीड जिल्हा स्वातंत्र्य सैनिक रेल्वे मागणी आंदोलन समितीचे निमंत्रक नामदेव क्षीरसागर म्हणाले, भाजपाचे सरकार असल्याने बीड रेल्वेसाठी मोठी आर्थिक तरतूद केली जाईल अशी अपेक्षा होती तसे झाले नाही. रेल्वे अर्थ संकल्पात नगर-बीड-परळीसाठी केवळ २० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ही तरतूद अतिशय तुटपुंजी आहे. हा प्रकल्प एकुण २८२० कोटी रुपयांचा आहे. आता पर्यंत नगर-बीड-परळीसाठी ३०९ कोटी रुपये खर्च झाले आहे. मागच्या काळात महाराष्ट्र सरकारने १७८ कोटी तर रेल्वे खात्याने १५८ कोटी रुपये दिले आहे. २००८ मध्ये तांत्रिक मान्यता मिळाली होती. यंदाच्या अर्थ संकल्पात नगर-बीड-परळीसाठी केवळ २० कोटींची तरतूद केली असल्याचा आम्ही निषेध करतो. नगर जिल्हा तीन तास, उस्मानाबाद जिल्हा तीन तास, औरंगाबाद, जालना तीन तास व परभणी जिल्हा तीन ते साडेतीन तासाच्या अंतरावर आहेत. बीड जिल्हा हा या पाचही जिल्ह्यांच्या केंद्रस्थानी येत असल्याने रेल्वेचा लाभ नागरिकांना निश्चितच होईल. हा मार्ग सर्वांसाठीच सोयीस्कर व आर्थिक स्थैर्य देणार ठरेल. रेल्वेसाठी पूरक स्थिती असतानाही नगर-बीड-परळी रेल्वे मार्गाकडे केंद्रीय रेल्वे विभाग सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले जात नसल्याने रेल्वेचा प्रश्न रखडत चालला आहे. दर पाच वर्षाला रेल्वे खाते नगर-बीड- परळीसाठी थोडी आर्थिक तरतूद करते. मात्र आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात रेल्वे मंत्री सदानंद गौडा नगर-बीड-परळी रेल्वेला केवळ २० कोटींची तरतूद केली आहे. चौदा वर्षापासून जवळपास वीस किमीचे काम पूर्णनगर-बीड-परळी रेल्वेचे काम हे २५० कि.मी.चे असून हे काम गेल्या चौदा वर्षापासून सुरुआहे. आतापर्यंत केवळ वीस कि.मी.चे काम झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. २०१४ पर्यंत रेल्वेचे अहमदनगर ते अंमळनेरपर्यंत रेल्वे रुळ टाकण्याचे काम झाले आहे. तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करत कामे केली जात आहेत. बीड रेल्वेसाठीचा खर्च दुप्पट झाला आहे तरी रेल्वेचे काम अत्यंत धिम्या गतीने सुरु आहे. त्यात रेल्वेमंत्र्यांनी बीड रेल्वेसाठी केवळ २० कोटींची तरतूद केल्याने हा प्रश्न पुन्हा मार्गी लावण्यासाठी बीडकरांना प्रखर आंदोलनाशिवाय पर्याय नाही. हे काम जलदगतीने पूर्ण झाले असते तर त्याचा लाभ जिल्हावासियांना झाला असता. वेळोवेळीच आश्वासने ठरली फोलबीड जिल्ह्यातील नेते राज्याच्या राजकारणात सक्रिय आहे. मात्र रेल्वेसाठी त्यांचे प्रयत्न होत नसल्याने नगर-बीड-परळी रेल्वे प्रश्न रखडत चालला आहे. निवडणुका आल्या की रेल्वेचे आठवण करुन रेल्वेचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन नेते देतात. प्रत्यक्षात रेल्वे निधीसाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्यात स्थानिक नेते हतबल ठरत आहे काय? असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे. पुन्हा झाली खा. गोपीनाथ मुंडेंची आठवणदिवंगत केंद्रीय ग्राम विकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांची आठवण आज पुन्हा ताजी झाली. २००९ साली खा. मुंडे यांनी केंद्रात लढून बीड रेल्वेसाठी चारशे कोटीहून अधिकची तरतूद करवून घेतली होती. त्यांचे अपघाती निधन झाल्यामुळे बीड जिल्ह्याचा मोठा तोटा झाला आहे. हे या निमित्ताने समोर आले आहे. खा. मुंडे असते तर कदाचित त्यांनी नगर-बीड-परळीचा प्रश्न लावून धरला असता अन् त्यासाठी मोठा निधी खेचून आणला असता अशा प्रतिक्रिया जिल्ह्यातील नागरिक व्यक्त करत आहेत.
नगर-बीड-परळी रेल्वेसाठी केवळ २० कोटींची तरतूद; पुन्हा निराशा !
By admin | Updated: July 9, 2014 00:27 IST