हणमंत गायकवाड, लातूरमागच्या आर्थिक वर्षात झालेल्या कामांची स्लीप वजा करता चालू आर्थिक वर्षात १० कोटी ५५ लाख ८० हजार ९५ रुपये आमदारांचा निधी शिल्लक आहे. जिल्ह्यातील सहाही आमदारांनी २५ जुलैअखेर २२४ कामे प्रस्तावित केली आहेत. त्यावर १० कोटी ७५ लाख ३५ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता लवकरच लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आमदारांनी नियोजन समितीकडे कामांच्या शिफारशी केल्या आहेत. लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील आमदार अमित देशमुख यांनी १४ कामे प्रस्तावित केली आहेत. या कामांसाठी १ कोटी ३० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. तर लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे वैजनाथ शिंदे यांनी ३६ कामांची शिफारस केली असून, त्यावर १ कोटी ७० लाख रुपये खर्च होणार आहेत. अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी ३९ कामे सुचविली आहेत. या कामांवर १ कोटी ८९ लाख ७५ हजार रुपये खर्च दर्शविला आहे. औसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बसवराज पाटील यांनी ४१ कामे प्रस्तावित केली असून, त्यावर २ कोटी ३१ लाख ६० हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. उदगीर राखीव विधानसभेचे आमदार सुधाकर भालेराव यांनी ६४ कामे प्रस्तावित केली असून, त्यावर २ कोटी ४ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. निलंगा विधानसभा मतदारसंघातील आमदार डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी ३० कामे प्रस्तावित केली असून, त्या कामांवर १ कोटी ५० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. सगळ्याच आमदारांनी शिलकीपेक्षा अधिकचा खर्च मान्यतेच्या प्रस्तावात दिला आहे.२०१४-१५ या चालू वर्षातील सहा आमदारांचा १० कोटी ५५ लाख ८० हजार ९५ रुपये निधी शिल्लक आहे. राज्यमंत्री अमित देशमुख यांचा १ कोटी १८ लाख ७५ हजार ४८६ रुपयांचा निधी शिल्लक आहे. या निधीतून त्यांनी विविध १४ कामे प्रस्तावित केली आहेत. त्यासाठी १ कोटी ३० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील आमदार वैजनाथ शिंदे यांचा चालू आर्थिक वर्षात १ कोटी ६२ लाख १७ हजार रुपयांचा निधी शिल्लक आहे. त्यांनी या शिलकी निधीतून ३६ कामे प्रस्तावित केली आहेत.अहमदपूर विधानसभा मतदारसंघातील आमदार बाबासाहेब पाटील यांचा चालू आर्थिक वर्षात १ कोटी ९९ लाख ७० हजार ८३४ रुपयांचा निधी शिल्लक आहे. त्यांनी विविध ३९ कामांसाठी नियोजनकडे प्रस्ताव सादर केला आहे. औसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बसवराज पाटील यांचा चालू आर्थिक वर्षात १ कोटी ८६ लाख ४५ हजार १०४ रुपयांचा निधी शिल्लक आहे. त्यांनी विविध ४१ कामांची शिफारस नियोजन विभागाकडे केली आहे. उदगीर विधानसभा मतदारसंघातील आमदार सुधाकर भालेराव यांचा १ कोटी ९१ लाख ६२ हजार रुपयांचा निधी शिल्लक आहे. त्यांनी ६४ कामांसाठी प्रस्ताव दिले आहेत. निलंगा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा १ कोटी ९७ लाख ९ हजार ६७१ रुपयांचा निधी शिल्लक आहे. त्यातून त्यांनी ३० कामे प्रस्तावित केली आहेत.आचारसंहितेपूर्वी खर्चाची नव्हे, मान्यतेची आवश्यकता...आमदार महोदयांनी प्रस्तावित केलेल्या कामांना आचारसंहितेपूर्वी मंजुरी घेणे आवश्यक आहे. खर्च ३१ मार्च २०१५ पर्यंत करण्यास मुभा आहे. त्यानुसार प्रस्तावित कामांना मंजुरी देण्याची प्रक्रिया सुरू आहे. मंजुरी झाल्यानंतर आचारसंहितेत कामे करण्यास व खर्च करण्यास काही अडचण नाही, असे जिल्हा नियोजन अधिकारी एस.एस. रेड्डी यांनी सांगितले.
पावणेअकरा कोटींची २२४ कामे प्रस्तावित
By admin | Updated: July 26, 2014 00:39 IST