बीड:जिल्हा परिषदेत बेकायदेशीर पदोन्नत्यांचा सिलसिला सुरुच आहे. माध्यमिक शाळेतील एका शिक्षिकेला बेकायदेशीररीत्या थेट कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी या पदावर पदोन्नती दिल्याची माहिती समोर आली आहे. सीमा खंडू टकले असे त्या शिक्षिकेचे नाव आहे. त्या पाटोदा येथील कन्या प्रशालेत माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. पदोन्नत्यांची प्रक्रिया सुरु नसताना सीमा टकले यांना कनिष्ठ विस्तार अधिकारी या पदावर पदोन्नतीचे आदेश जावक क्र. १४५१ प्रमाणे २० मे रोजी शिक्षण विभागातून निघाले आहेत. टकले यांना पाटोदा प्रशालेतून आष्टी पंचायत समितीत पदोन्नतीवर पाठविले आहे. या पदोन्नती आदेशावर केवळ खूद्द सीईओ राजीव जवळेकर यांचीच स्वाक्षरी आहे. दरम्यान, नियमानुसार पदोन्नत्या देण्यापूर्वी समितीची बैठक व्हावी लागते. त्यानंतर सेवाज्येष्ठता, बिंदूनामावली तपासून नंतरच पदोन्नती प्रक्रिया राबवावी लागते. मात्र, मागील तीन वर्षांपासून पदोन्नती समितीची बैठकही झालेली नाही. शिवाय सीमा टकले यांचा कर्तव्य कालावधी केवळ पाच वर्षांचा आहे. इतर अनेक जण पदोन्नतीस पात्र असताना त्या सर्वांना डावलून सीमा टकले यांना पदोन्नती बहाल करण्यात आली आहे. वस्तीशाळा शिक्षकांच्या नियुक्त्यांचे प्रकरण गाजत असतानाच नियमबाह्य पदोन्नती प्रकरणाची त्यात भर पडली आहे. याबाबत शिक्षणाधिकारी (प्रा.) भास्कर देवगुडे यांच्याशी संपर्क केला असता तो होऊ शकला नाही. (प्रतिनिधी) पदोन्नती चुकीची! माध्यमिक शिक्षकांना ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी तर प्राथमिक शिक्षकांना कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी या पदावर पदोन्नती देता येते. जिल्हा परिषदेने मात्र, सीमा टकले या माध्यमिक शिक्षिका असताना त्यांना कनिष्ठ विस्तार अधिकारी केले आहे. ज्येष्ठतेनुसारच हव्यात पदोन्नत्या पदोन्नती प्रक्रिया सेवाज्येष्ठतेनुसारच राबविली गेली पाहिजे. पदोन्नती समितीची तीन वर्षांपासून बैठक नाही. त्यामुळे बैठक घेऊन ज्येष्ठता यादी, बिंदूनामावली तपासूनच पदोन्नत्या द्याव्यात अशी मागणी कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे जिल्हाध्यक्ष शेख मुसा यांनी केली आहे.
नियम डावलून शिक्षिकेस पदोन्नती
By admin | Updated: May 30, 2014 00:23 IST