पारध: भोकरदन तालुक्यातील पारध परिसरात मोठ्या प्रमाणात मिरचीची लागवड केलेली आहे. विहिरींना पाणी असल्याने ठिबक सिंचनाचा आधार घेत ६० टक्के शेतकऱ्यांनी हे पीक घेतले. मात्र आता रोपांना कोकडा रोगाने ग्रासले आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी हवालदिल झाले आहेत.परिसरातील पिंपळगाव रेणुकाई, लिहा, शेलूद, पारध खुर्द, पद्मावती, वालसावंगी येथील शेतकऱ्यांनी हजारो रूपये खर्च करून ठिबक संच खरेदी केले. मोठ्या प्रमाणावर मिरचीची लागवड केली. मात्र सुरूवातीपासूनच या रोपांवर कोकडा रोगांचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी महागडी औषधींची फवारणी करून ही रोपे जगविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचा उपयोग झालेला नाही. ६० ते ७० टक्के रोपे या रोगामुळे खराब झाल्याने शेतकऱ्यांना ते उपटून टाकावे लागले. उर्वरीत रोपे जगविण्याचा शेतकरी आटोकाट प्रयत्न करीत असतानाच भारनियमनात वाढ झाली. त्यातच मागील १५ दिवसांपासून हवेचा जोेर जास्त असल्याने विहिरींच्या पाणीपातळीही मोठी घट होत आहे.काही विहिरी तसेच कूपनलिका कोरड्याठाक पडल्या आहेत. त्यामुळे मोठ्या आशेवर जगविलेल्या मिरचीला पाणी द्यायचे कसे हे मोठे संकट शेतकऱ्यांवर ओढावले आहे.पावसाची प्रतीक्षाजून महिना संपला तरी परिसरात अद्यापपर्यंत पाऊस पडला नाही. ठिबकवर आता पर्यंत मिरची व धूळ पेरणीतील कपाशी कशीबशी जगविली. मात्र विहिरीतील पाणी पातळीत होणारी घट आणि वाढते भारनियन यामुळे पिके धोक्यात आली आहेत. तर अद्याप खरिपाची पेरणीच न झाल्याने शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहे. (वार्ताहर)
पारध परिसरात मिरची पिकावर कोकडा रोगाचा प्रादुर्भाव
By admin | Updated: July 3, 2014 00:21 IST