राजेश भिसे , जालनातुरुंगातील खडकाळ जमिनीवर श्रमदानातून सांडपाण्याद्वारे भाजीपाला शेती फुलविण्याचा प्रयोग कैद्यांनी यशस्वी करुन दाखविला आहे. भेंडी, टोमॅटो, भोपळा, वांगी, पालक, मेथी, वाल, कडीपत्त्याची लागवड करण्यात आलेली आहे. एक वर्षापूर्वी जालना शहरातील सर्वे क्रमांक ४८८ मध्ये जिल्हा तुरुंगाची इमारत कार्यान्वित करण्यात आली. ६०० कैद्यांची क्षमता असलेल्या या तुरुंगात सध्या २१४ कैदी ठेवण्यात आलेले आहेत. यातील बहुतांश कच्चे कैदी आहेत. एकूण १६ बराकी असून, सध्या ४ ते ५ बराकींमध्ये कैद्यांना ठेवण्यात आलेले आहे. १३ एकर परिसरात तुरुंगाची इमारत बांधण्यात आलेली आहे. उर्वरित जागेवर अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवासस्थाने व इतर जागा मोकळी आहे. तुरुंग अधीक्षक बी.एस. खराटे यांनी कैद्यांची मनोवृत्ती सकारात्मक व्हावी, तसेच त्यांच्यातील गुन्हेगारी वृत्ती नष्ट व्हावी या उद्देशाने विविध उपक्रम राबविले. त्याचाच एक भाग म्हणून तुरुंगासह अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांतून सोडण्यात आलेल्या सांडपाण्यावर भाजीपाला शेती करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला. खडकाळ असलेल्या या जमिनीचे सुरुवातीला कैद्यांनी खोदकाम करुन इतर भागातील माती त्यावर टाकली. शेती औजारांचा कुठलाही वापर न करता त्यांनी ३५ गुंठे जमिनीवर भेंडी, टोमॅटो, भोपळा, वांगी, पालक, मेथी, वाल, कडीपत्ता आदी पिकांची लागवड केली. पंधरा दिवसांपूर्वीच हा उपक्रम हाती घेण्यात आला असून, टोमॅटो, वांगी, वाल, पालक आदी भाजीपाल्यांचे चांगले उत्पादन आले आहे. विशेष म्हणजे परिसरातील गावांतील ग्रामस्थांनी रोपटे आणून दिले आहेत. खोल जाणारी पाणीपातळी आणि पाण्याच्या दुर्भिक्षामुळे कमीत कमी पाण्यावर पिक घेण्याचा तुरुंग अधीक्षक खराडे यांचा प्रयत्न आहे. यासह लिंब, वड, बदाम या व इतर विविध प्रकारच्या २०० वृक्षांची लागवड तुरुंग परिसरात करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे अॅड. किशोर राऊत यांनी नेत्र तपासणी शिबिर व पुस्तके भेट आदी उपक्रम राबविले. शेतीसह वृक्षांचे संगोपण चांगल्या पद्धतीने कैदी करीत असून, आगामी शेती क्षेत्र वाढविण्याचा विचार खराटे यांनी बोलून दाखविला.
कैद्यांनी फुलवली भाजीपाला शेती
By admin | Updated: March 19, 2016 00:44 IST