औरंगाबाद : पॉर्न फिल्म पाहताना तयार केलेल्या क्लिपचा शस्त्रासारखा वापर करून एका प्राचार्याला अगोदर पदाचा राजीनामा देण्यास भाग पाडले. त्यानंतर ते पद हस्तगत करून पदावनत झालेल्या प्राचार्यांकडून थेट ५ लाख रुपयांची खंडणी उकळण्यात आली. हा प्रकार येथील मौलाना आझाद अध्यापक महाविद्यालयात घडला. याप्रकरणी माजी प्राचार्याच्या तक्रारीवरून महाविद्यालयाच्या विद्यमान प्राचार्यांसह दोघांना पोलिसांनी अटक केली.प्राचार्य शेख इम्रान (रा. मजनू हिल) आणि तंत्रज्ञ चिश्ती हबीब (रा.जटवाडा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांनी सांगितले की, मौलाना आझाद अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून डॉ. सोेहेल मोहंमद खान (रा. सदफ कॉलनी) हे कार्यरत होते. कार्यालयात असताना ते जेव्हा त्यांचा लॅपटॉप उघडत त्यावेळी पॉर्न क्लिप सुरू व्हायची. पॉर्न क्लिप त्यांना बंद करता येत नव्हती. यामुळे ते लॅपटॉप तेथेच ठेवून कर्मचाऱ्यास बोलावून आणत आणि ती क्लिप बंद करीत. असा प्रकार अनेकदा घडला. त्यांच्या केबीनमध्ये असलेल्या सीसीटीव्हीमध्ये हा सर्व प्रकार कैद झाला. त्याच्या व्हिडिओ क्लिप आरोपींनी तयार केल्या. पन्नाशी ओलांडलेल्या सोहेल यांना आरोपी विद्यमान प्राचार्य शेख इम्रान आणि चिश्ती हबीब यांनी गाठून तुम्ही या वयात अशा घाणेरड्या क्लिप कार्यालयात पाहता. या क्लिप तुमच्या घरी आणि नातेवाईकांना दाखवून तुमची बदनामी करतो, अशी धमकी देण्यास सुरुवात केली. तुम्ही स्वेच्छा निवृत्ती घ्या आणि आम्हाला २५ लाख रुपये द्या, अन्यथा तुमची बदनामी केली जाईल, अशी धमकी ते सतत देत होते. ८ ते १६ आॅगस्टदरम्यान हा प्रकार घडला. आरोपीने आपणास ब्लॅकमेल करून खंडणी उकळल्याने प्राचार्य सोहेल यांनी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांची भेट घेऊन घडलेला प्रकार सांगितला. गुन्हे शाखा पोलिसांनी आरोपींविरोधात सिटीचौक ठाण्यात गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक केली. ४आरोपींच्या दबावामुळे डॉ. सोहेल खान यांनी प्राचार्यपदाचा राजीनामा दिला. त्यांनी राजीनामा देताच शेख इम्रान हे त्यांच्या जागेवर प्राचार्य म्हणून विराजमान झाले. परंतु तरीही आरोपींकडून पैशासाठी तगादा सुरूच होता. शेवटी सोहेल यांच्याकडून त्यांनी ५ लाख ५ हजारांचा धनादेश घेतला. खात्यात रक्कम नसल्याने तो न वटता बँकेतून परत आला. यामुळे आरोपींनी पुन्हा दुसरा धनादेश प्राचार्य सोहेल यांच्याकडून घेतला. हा धनादेश बँकेत टाकून ५ लाख ५ हजार रुपये काढून घेतले.
प्राचार्याने घेतली खंडणी
By admin | Updated: November 5, 2016 01:34 IST