परभणी : लोकमत बाल विकास मंच आणि लोकमत सखी मंच यांच्या वतीने २३ जून रोजी ‘सर तुम्ही गुरुजी व्हा’ या नाटकाचे सादरीकरण केले जाणार आहे. सायंकाळी ४ वाजता परभणी शहरातील हरिप्रसाद मंगल कार्यालयात हा प्रयोग होईल.लोकमत सखी मंच आणि बाल विकास मंचच्या वतीने विविध सांस्कृतिक उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सखी मंच व बाल विकास मंचच्या सदस्यांसाठी हे नाटक सादर होणार आहे. त्र्यंबक वडसकर यांनी दिग्दर्शित केलेल्या नाटकात पोखर्णी नृसिंह येथील नृसिंह विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांनी भूमिका केल्या आहेत. विद्यार्थ्यांचा सकस अभिनय आणि वास्तवता मांडणाऱ्या स्क्रिप्टमुळे प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलेले हे नाटक आहे. राज्य नाट्य स्पर्धेत आजपर्यंत दहा पारितोषिके या नाटकाने पटकाविली आहेत. त्यामुळे विद्यार्थीॅ, शिक्षक आणि पालक यांनी आवर्जून पहावे असे हे नाटक आहे. या संधीचा सदस्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन लोकमततर्फे करण्यात आले आहे. याच कार्यक्रमात बालविकास मंचच्या ड्रॉर्इंग स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरित केले जाणार आहेत. त्याचप्रमाणे सखी मंच लक्की ड्रॉ सुनिता साडी सेंटर यांच्या वतीने काढण्यात येणार आहे. विराज एंटरप्रायजेस, विलास कौसडीकर आणि आचार्य कोचिंग क्लासेसचे बालाजी सुर्वे यांनी या कार्यक्रमाचे प्रायोजकत्व स्वीकारले आहे़ (प्रतिनिधी)
सोमवारी ‘सर तुम्ही गुरुजी व्हा’ नाटकाचे सादरीकरण
By admin | Updated: June 22, 2014 00:23 IST