औरंगाबाद : माहेरून दहा लाख रुपये आणावे, याकरिता पतीसह सासरच्या मंडळीकडून सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून गर्भवती विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी न्यू हनुमाननगरात घडली. या घटनेनंतर विवाहितेच्या वडिलांनी नोंदविलेल्या तक्रारीवरून पुंडलिकनगर पोलिसांनी पतीसह सासू, सासरा आणि नणंदा अशा सहा जणांंविरोधात हुंडाबळी कायद्यान्वये गुन्हा नोंदविला.
अमोल अण्णासाहेब त्रिभुवन, सासरा अण्णासाहेब, सासू सिंधूबाई, नणंद भाग्यश्री मुन्ना महांकाळे (रा. भारतनगर, गारखेडा), नणंद अंजू आणि जयश्री अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत. पूजा अमोल त्रिभुवन (२०,रा. न्यू हनुमाननगर)असे मृत विवाहितेचे नाव आहे.
पूजा आणि अमोल यांचा गतवर्षी १४ जून रोजी महांकाळ वडगाव (ता. श्रीरामपूर, जि. अहमदनगर) येथे विवाह झाला. दीड तोळ्याची अंगठी आणि ३५ हजार रुपये हुंडा पूजाच्या आईवडिलांनी आरोपींना दिला होता. लग्नानंतर तीन महिने चांगले वागविल्यावर आरोपींनी काहीतरी व्यवसाय करण्यासाठी अथवा प्लाॅट खरेदी करण्यासाठी माहेरहून दहा लाख रुपये आणण्याची मागणी केली. तुझ्या वडिलांकडे चांगली शेती आहे, तुझ्या वाट्याची शेती विकून पैसे देण्यास सांग, असे म्हणून त्यांनी तिचा छळ सुरू केला. ही बाब पूजाने आई, वडील आणि भावाला फोन करून सांगितली. यानंतर त्यांनी आरोपींना समजावून सांगितल्यानंतरही त्यांच्याकडून तिला त्रास सुरूच होता. यामुळे पाच ते सहा महिन्यांपूर्वी ते तिला माहेरी घेऊन गेले होते. तेव्हा आरोपींनी यापुढे त्रास देणार नाही, असे सांगून ते तिला नांदायला घेऊन आले. येथे आणल्यावर त्यांनी तिचा पुन्हा छळ सुरू केला. पूजा गर्भवती असून ती लाडकी असल्याने तिचे वडील पैसे देतील, अशी त्यांना अपेक्षा होती. तिच्या वडिलांनीही आरोपींना पैसे देण्यासाठी शेती विकण्याची तयारी सुरू केली होती. मात्र, त्रास वाढतच असल्याने सोमवारी सकाळी पूजाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही बाब कळताच तिच्या पतीने तिला घाटीत दाखल केले. तिचा पतीशिवाय अन्य आरोपी घराला कुलूप लावून पळून गेले होते. याविषयी पूजाचे वडील सुभाष यादव महांकाळे यांनी पुंडलिकनगर ठाण्यात तक्रार नोंदविली. आरोपींच्या अटकेसाठी तिच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका घेतली होती.