पाटोदा: संत वामनभाऊ यांचे समाधीस्थळ, संत भगवानबाबा यांचे जन्मगाव येथे जाणार्या रस्त्यासह परिसरातील रस्त्यांवर खड्डेच खड्डे झाले आहेत. यामुळे भाविकांसह ग्रामस्थांना जीव मुठीत धरून प्रवास करण्याची वेळ आली आहे. संत वामनभाऊ महाराज यांचे चिंचोली गड येथे समाधीस्थळ आहे. येथे कुसळंब येथून जावे लागते. कुसळंब ते चिंचोलीगड अवघा १५ कि.मी.चा रस्ता आहे. या रस्त्यावर ठिकाठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. तर अनेक ठिकाणी रस्ताही उखडला आहे. यामुळे वामनभाऊंच्या समाधीच्या दर्शनासाठी जाणार्या भाविकांची मोठी गैरसोय होत आहे. या परिसरात सावरगाव हे संत भगवानबाबा यांचे जन्मगाव आहे. भगवानबाबांचे जन्मस्थळ व वामनभाऊ यांचे समाधीस्थळ यात अवघे ९ कि.मी.चे अंतर आहे. मात्र हा रस्ताही काटेरी झुडूपांनी वेढला आहे. तसेच रस्ताही कमालीचा खराब झाल्याने भाविकांची मोठी गैरसोय होते. निवडणुका आल्या की, नेते मंडळी येथे रांगा लावतात. समाधीस्थळ परिसराचा विकास करू अशी आश्वासने देऊन मताचा जोगवा मागतात. मात्र निवडणुका होताच या आश्वासनांचा त्यांना विसर पडतो. यामुळे या संत महंतांच्या तीर्थक्षेत्रासह परिसरातील रस्त्याची दैना कायमच आहे. या परिसरात नाथपंथियांचा वारसा जपणारे संत झाले. मात्र तेथेही विकास कामांचा वानवाच आहे. त्यामुळे रस्त्यासह इतर विकास कामांची मागणी आहे. या संदर्भात सा.बां.चे प्रभारी उपअभियंता व्ही.डी. बारगजे म्हणाले, रस्त्यांच्या कामासाठी पाठपुरावा सुरू आहे. (वार्ताहर)
गडाकडे जाणार्या रस्त्यावर खड्डे
By admin | Updated: May 15, 2014 00:04 IST