लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मराठवाड्यात आॅइल डेपो होण्याची शक्यता धूसर होत चालली आहे. मागील सरकारने ५ वर्षे तर विद्यमान सरकारने तीन वर्षांपासून डेपो होण्याची शक्यता पडताळणीत घातल्याने हा डेपो आगामी काळात कधी होणार हे सांगणे अवघड आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाकडे आठ वर्षांपासून याबाबत पाठपुरावा सुरू असून, याकडे गांभीर्याने कुणीही पाहावयास तयार नाही. दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर, शेंद्रा- बिडकीन इंडस्ट्रियल पार्क, पंचतारांकित शेंद्रा एमआयडीसी, ड्रायपोर्ट, एअरपोर्ट, समृद्धी महामार्ग, विमान आणि रेल्वे दळणवळण आदी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी संबंधित प्रकल्प औरंगाबादेत आहेत व काही प्रकल्प होऊ घातले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात पेट्रोल, डिझेल, आॅइल, गॅस यासारख्या गोष्टींची अत्यावश्यक गरज भासणार आहे. त्या अनुषंगाने आॅइल डेपो विभागात असणे गरजेचे आहे. मागील आठ वर्षांपासून आॅइल डेपोसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. पंचतारांकित शेंद्रा एमआयडीसीत १५० एकर जागेवर आॅइल डेपो त्वरित उभारण्याची मागणी वारंवार केली जात आहे; परंतु त्याकडे फारसे लक्ष दिले जात नसल्याची ओरड होत आहे. पेट्रोल, डिझेल डीलर्स असोसिएशन व अधिकाऱ्यांनी यापूर्वी अनेकदा निवेदनाद्वारे आॅइल डेपोसाठी मागणी केलेली आहे. संसदीय समितीसमोर अनेकदा पेट्रोलियममंत्र्यांनी आॅइल डेपो सुरू करण्याचे आदेश दिले; परंतु हा प्रकल्प रखडलेलाच आहे. या प्रकल्पासाठी गेल्या सात ते आठ वर्षांपासून केंद्र शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. तीन वर्षांपूर्वी सरकार बदलले तरीही सेना-भाजपला हा प्रकल्प मार्गी लावता येत नाही, असेच म्हणावे लागेल. सीएनजीचे निवेदन पाहिले नाहीभाजपच्या एका कार्यकर्त्याने शहरात सीएनजी पंप वाढविण्यासाठी डॉ. प्रधान यांना निवेदन दिले. ते निवेदन त्यांनी पाहिले नाही. शहरात २२ हजारांहून अधिक रिक्षा धावतात. त्यांच्यासाठी दोनच पंप शहरात आहेत. ते पंप वाढविण्याची मागणी निवेदनात होती.
आॅइल डेपो होण्याची शक्यता धूसर
By admin | Updated: June 7, 2017 00:28 IST