बालाजी आडसूळ , कळंबचित्तवेधक, मनमोहक रंग आणि गंध असलेली फुले आणि त्यांना नियंत्रित करणारे पॉलिहाऊस हे चित्र आजवर आपणाला पाश्चात्य देशात पहावयास मिळत असे. परंतु पारंपरिक शेती व्यवसायाच्या जोखडातून बाहेर पडून कळंब तालुक्यातील २१ शेतकऱ्यांनी आधुनिक पॉलिहाऊस उभारुन यापैकी १३ पॉलीहाऊसमधून दर्जेदार जरबेरा फुलाच्या उत्पादनास सुरुवात केली आहे. कृषी विभागाचे मार्गदर्र्शन व बँकाचे सहकार्य यामुळे राज्यातील आगळा वेगळा गटशेतीचा हा प्रयोग यशस्वी होऊन इतरांना मार्गदर्शक ठरत आहे.कळंब तालुका हा तसा पारंपारीक शेती व्यवसाय करणारा आहे. खरीप व रबी हंगामातील नियमित पिके घेणे, पाणी उपलब्ध असेल तर ऊस शेती करणे असा शेतीप्रवाह रुढ असलेल्या तालुक्यात तसा सृजनशील शेतीचा, यांत्रिक व आधुनिक शेतीचा गंधच नाही. यासंदर्भात एखादे रोल मॉडेल नसल्याने अनुकरण करायचे तरी कोणाचे? अनुकरण केले तर स्थानिक बँका दारात उभे राहू देत नसल्याने भांडवल उभारायचे कोठून असे अनेक प्रश्न नवे तंत्र डोक्यात असून, शेतकऱ्यांच्या समोर उभे राहत होते.या पार्श्वभूमीवर जवळा (खु) येथील शेतकरी दिलीप नारायण लोमटे यांनी पारंपरिक शेतीस पूरक म्हणून एखादा नाविन्यपूर्ण शेतीप्रयोग करण्याचा निश्चय केला. यासाठी दूरदूर जाऊन नव्या तंत्राची, साधनाची माहिती जाणून घेतली. स्वत: पायाभूत सुविधांपासून शासनाच्या कृषी विभागाच्या योजनांचे बँकेच्या मदतीचे अवलोकन करुन पॉलीहाऊस उभा करुन त्याद्वारे दर्जेदार फूल उत्पादन करण्याचा मानस त्यांनी केला. यासाठी त्यांना कृषी सहाय्यक बी.व्ही. लोकरे, तालुका कृषी अधिकारी एम.आर. मोरे, मनोज पडवळ व अभिजीत काकडे या शेतकऱ्यांनी मार्गदर्र्शन केले.१३० गुंठ्यात उत्पादन सुरूया धरती फूल उत्पादक गटातील दिलीप लोमटे (जवळा खु), गोपाळ शेळके, श्रीकांत झोरी, शंकर गरड (सर्व खामसवाडी), ज्ञानेश्वर गोरे (देवधानोरा), जयदेव जरंगे, हरिराम मुर्गे, वैजिनाथ डोंगरे (सर्व बोरवंटी), रमेश टेकाळे, जयश्री टेकाळे (पाडोळी), मनीषा आवाड (आवाड शिरपुरा), अनिल काळे (बोर्डा), उमेश शेळके (खामसवाडी) या शेतकऱ्यांनी शेतातील आधुनिकतेची कास धरुन आपल्या शेतात पॉलीहाऊस उभारले आहेत. या पॉलीहाऊसचा आकार दहा गुंठे असून, यामध्ये प्रत्येक पॉलीहाऊसमध्ये जवळपास ६०० ते ६५०० जरबेरा फुलाच्या झाडाची लागवड केली आहे.प्रत्येकी १२ लाखाचा खर्चफुल उत्पादनासाठी तयार करण्यात येणाऱ्या या पॉलीहाऊस प्रकल्पासाठी जवळपास १२ लाख रुपयाचा खर्च येतो. एवढे खर्च करण्याची ऐपत शेतकऱ्यांची नसते. यासंदर्भात सदर प्रस्ताव सुरुवातीस कळंब येथील बँक आॅफ इंडियास सादर करण्यात आला. त्यांनी सकारात्मक साथ देऊन पाच सभासदास कर्ज वाटप केले. तद्नंतर बँक आॅफ महाराष्ट्राच्या कळंब शाखेकडे ७ व्यक्तींना भांडवल उपलब्ध करुन दिले. या बँकांनी आर्थिक हातभार लावल्याने व कृषी विभागाने वेळोवेळी अनमोल मार्गदर्शन केल्यानेच आमचा प्रयोग यशस्वी झाल्याचे दिलीप लोमटे यांनी सांगितले.उत्पादन व विक्री व्यवस्थापनपॉलीहाऊसमध्ये फुलाचे उत्पादन घेत असताना मोठी काळजी घ्यावी लागते. वातावरणातील तापमान नियंत्रणासाठी फॉगरचा वापर केला जातो. याशिवाय सिंचन हे संपूर्णत: ठिबक सिंचन यावर अवलंबून आहे. खते ठिबक सिंचनद्वारेच दिली जातात. फक्त औषधीची फवारणी एसटीपीद्वारे केली जाते. याशिवाय तयार झालेल्या मालाची विक्री व्यवस्थापन सामूहिकरीत्या सांभाळली जात असून, यासाठी सर्वांसाठी एक तैनातीत ठेवले आहे. उत्पादीत माल हैदराबाद येथे पाठविला जात असून, गट असल्याने सर्वांच्या उत्पादित मालावर व विक्रीवर नियंत्रण ठेवणे सोपे जाते.आगळा वेगळा उपक्रमपॉलीहाऊस उभारणे किंवा फूलशेती करणे हे आता नवीन राहिलेले नाही. परंतु शेतातील हा प्रयोग सामूहिकरीत्या तेही यशस्वीरीत्या करणे हा एक आगळा वेगळा उपक्रम आहे. पश्चिम महाराष्ट्रात प्रगत शेतीचे वारे वाहत आहे. परंतु याचा मागमूस नसलेल्या मराठवाड्यातील कळंब सारख्या तालुक्यात इस्त्रायलसारखा प्रगत व सामूहिक शेतीचा हा अभिनव उपक्रम यशस्वी झाला आहे. आणखी या गटातील अनिल लोमटे, बंडू गायकवाड, प्रणव चव्हाण, अभिमन्यू लोकरे, बन्शी शेळके, बाबा माने, रणजित देशमाने यांच्या पॉलीहाऊसचे काम अंतिम टप्प्यात असून, लवकरच यामध्ये जरबेराची फूलशेती बहरणार आहे. तसेच उपरोक्त शेतकऱ्यांना तालुका कृषी अधिकारी एम.आर. मोरे, धरती फूल उत्पादक गटाचे अध्यक्ष दिलीप लोमटे मार्गदर्शन करत असून, या सर्वांच्या पॉलीहाऊसमध्ये फुल उत्पादन निघाल्यास जरबेरा फुल उत्पादनाचा व सामूहिक शेतीचा हा एक उच्चांक ठरणारा आहे.२३ शेतकऱ्यांचा गटआपण स्वत:च एखादा प्रयोग करुन यशस्वी होण्याबरोबरच यामध्ये इतर होतकरु शेतकऱ्यांना सामावून घेऊन बाजारपेठ व विक्री व्यवस्थापन सोपे व्हावे, यासाठी दिलीप लोमटे यांनी स्वत:च्या अध्यक्षतेखाली व ज्ञानेश्वर गोरे सचिव असलेल्या २३ शेतकऱ्यांच्या धरती फूल उत्पादक शेतकरी गटाची स्थापना केली. या गटाने समूह पद्धतीने उत्पादन व विक्री व्यवस्थापन करण्याचा निर्णय घेतला. या सामूहिक एकीमुळे प्रत्येकाला आपसातील ज्ञान, माहिती मिळून फूल उत्पादन प्रयोगास फायदा होऊ लागला.
पारंपरिक शेतीला फाटा देत उभारले पॉलीहाऊस
By admin | Updated: July 1, 2014 01:04 IST