कळंब : कळंब-उस्मानाबाद मतदार संघात आता पक्षांतर्गत काटाकाटीचे राजकारण सुरु झाले आहे. विरोधी पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी व्युव्हरचना आखली जात आहे. या काटाकाटीमध्ये कोणाकोणाचा पत्ता कटणार आणि कोणाला खुर्ची मिळणार, हे मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे.कळंब - उस्मानाबाद मतदारसंघात चौरंगी फाईट होत आहे. प्रत्येक पक्षाने ही निवडणूक कमालीची प्रतिष्ठेची केली आहे. ‘अभी नही, तो कभी नही’ असा नाराचं पक्षश्रेष्ठींनी दिल्याने पदाधिकारी व कार्यकर्तेही जोमाने तयारीला लागल्याचे चित्र आहे. परंतु, या धामधुमीत प्रत्येक पक्षातील नाराज गट अजूनही शांत आहे. या गटाला आपल्याकडे खेचण्यासाठी प्रतिस्पर्धी पक्षांनी फिल्डींग लावली आहे.मतदारसंघात शिवसेनेतील गटबाजीने कहर केला आहे. हा नाराज गट अजूनही प्रचाराच्या रिंगणात उतरला नाही. तेरणा साखर कारखाना, तसेच सेना आमदारांच्या आजपर्यंच्या कार्याचा हिशोब मतदारांनी मागितला तर काय उत्तर द्यायचे? असा प्रश्न या नाराज गटाकडून विचारला जात आहे. त्यातच काँग्रेसची जिल्हा परिषदेत सेना-भाजपासोबत युती आहे. मग काँग्रेसवर टिका कोणत्या तोंडाने करायची? असा प्रश्नही शिवसैनिकांतून विचारला जातो आहे. या नाराज शिवसैनिकांना कोठे उघड तर कोठे अंतर्गत कामाला लावण्याची फिल्डींग राष्ट्रवादी व भाजपकडून आखली जात आहे. अशा नाराज गटांबरोबर चर्चेच्या दोन-तीन फेऱ्या झाल्याचेही विश्वसनीय वृत्त आहे.जिल्हा परिषदेत नुकत्याच झालेल्या विषय समित्यांच्या सभापती निवडीत तालुक्यातील काँग्रेसला स्थान न मिळाल्याने पक्षातील एक गट नाराज आहे. तालुक्यातील काँग्रेसच्या एकमेव जिल्हा परिषद सदस्या अर्चना शेळके यांना महिला व बालविकास सभापतीपद देण्याची कार्यकर्त्यांची मागणी होती. परंतु, सेनेने त्यांच्या सोईचे राजकारण केल्याने व काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनीही यात गांभिर्याने लक्ष न घातल्याने काँग्रेसचा एक गट सेना व काँग्रेसवरही नाराज आहे. त्यातच निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्त्यांना प्रचारामध्ये स्थान न दिल्याने काँग्रेसमध्ये नाराजी वाढली आहे. हा नाराज गटही भाजपा व राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याची जोरदार चर्चा आहे.‘आम्ही पक्षाचे जुने कार्यकर्ते असताना पक्षाने आमच्या कार्याची दखल घेतली नाही व उमेदवारीसाठी डावलले’ असे म्हणत तालुक्यातील भाजपाचा एक गट नाराज आहे. या नाराज गटातील दोन-चार कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या काही नेत्यांशी मदतीचा ‘हात’ देण्याची बोलणी केल्याची चर्चा आहे. या कार्यकर्त्यांमुळे भाजपाला काही फटका बसणार नाही. परंतु ‘त्या’ नेत्यांचा राष्ट्रवादीला काय फायदा होणार? असा प्रतिसवाल भाजपा कार्यकर्त्यांमधून केला जात आहे. भाजपाचे मतदान ‘फिक्स’ आहे. त्यामुळे कोणी कोठेही गेले तरी फरक पडणार नसल्याची भूमिका भाजपा गोटातून घेतली जात आहे.
पक्षांतर्गत शह-काटशहाचे राजकारण !
By admin | Updated: October 6, 2014 00:13 IST