लिफ्टने साहित्य नेण्याचा प्रकार
औरंगाबाद : घाटीतील सर्जिकल इमारतीत दुसऱ्या , तिसऱ्या मजल्यावर जाणाऱ्या रुग्णांना थांबवून लिफ्टमधून कचरा, वैद्यकीय साहित्य नेण्याचा प्रकार होत आहे. स्ट्रेचरवर गरोदर माता असतानाही लिफ्ट रिकामी होण्याची वाट पाहण्याची वेळ ओढावते. याकडे घाटी प्रशासनाने लक्ष देऊन हा प्रकार थांबविण्याची मागणी होत आहे.
तापमान दर्शक फलक काढला
औरंगाबाद : जालना रोडवरील सिंचन भवनसमोर तापमान दर्शविणारा फलक काही वर्षांपूर्वी बसविण्यात आला होता. शहरातील तापमानाची माहिती त्यावरून नागरिकांना मिळत होती. मात्र, या फलकावरून तापमान दिसणे मागील काही महिन्यांपासून बंद झाले होते. हा फलक आता काढून टाकण्यात आला आहे.
स्टेशनच्या प्रवेशद्वारासमोरच पार्किंग
औरंगाबाद : रेल्वेस्टेशनच्या प्रवेशद्वारासमोरच वाहनांची पार्किंग केली जात आहे. दुचाकी, चारचाकी आणि रिक्षा मिळेल त्या जागेत उभ्या केल्या जात आहेत. परिणामी, प्रवेशद्वाराला पार्किंगचे स्वरुप येत आहे.
दुभाजकांच्या दुरवस्थेने अपघाताचा धोका
औरंगाबाद : सिल्लेखाना चौक ते समर्थनगर रस्त्यावरील लोखंडी दुभाजक ठिकठिकाणी तुटले आहे. त्यामुळे दुभाजकात मोकळी जागा निर्माण झाली आहे. अशा ठिकाणाहून वाहनचालक अचानक वळण घेतात. त्यातून पाठीमागून येणाऱ्या वाहनधारकाला अचानक ब्रेक मारावा लागतो. अपघाताचा धोका वाढत असल्याने दुभाजकाची ही अवस्था दूर करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.