लातूर :चोरीच्या गुन्ह्यात ताब्यात घेतलेल्या अन् डिझेल असलेल्या कारमध्ये स्पार्किंग होऊन आग लागली. या आगीत कारसह एक पोलिस व्हॅन जळून खाक झाली असून, अन्य तीन वाहनांना हाळ लागली आहे. लातूर ग्रामीण पोलिस ठाण्यात ही घटना मंगळवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत आकस्मात जळिताची लातूर ग्रामीण पोलिसात नोंद करण्यात आली आहे. लातूर ग्रामीण पोेलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक आलापूरकर आणि चालक फुलारी हे मंगळवारी पहाटे गस्तीवर होते. पोलिस ठाण्याच्या हद्दीत ड्युटीवर असताना कन्हेरी रोडलगत के.ए. ३८ बी ५५६८ क्रमांकाचा ट्रक थांबला होता. या ट्रकच्या बाजूलाच एमएच १५ एबी १२०० या क्रमांकाची कार व दोन व्यक्ती होत्या. त्यांना ‘इथे का थांबलात’ असे विचारले असता कारमधील त्या दोघा व्यक्तींनी कारसह पलायन केले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून खाडगाव टी-पॉर्इंटजवळ त्यांना गाठले. पण कारमधील ते दोघे पळून जाण्यात यशस्वी झाले. कारमध्ये समोरचे सीट होते. परंतु, मागचे सीट काढून तिथे डिझेलचे भरलेले कॅन होते. १५, २५ आणि ५० लिटर्सचे कॅनने ही कार भरलेली होती. दरम्यान, या कारला टोचण लावून लातूर ग्रामीण पोलिस ठाण्यात आणली असता दहा ते पंधरा मिनिटांतच कारचे पुढील टायर जळाले. कारने अचानक पेट घेतला आणि आतील डिझेलचा स्फोट झाला. यावेळी कारच्या बाजूला पार्किंग केलेली पोलिस व्हॅनही जळून खाक झाली. शिवाय, लगतच असलेल्या एका टेम्पोला त्याची हाळ लागली असून, दोन दुचाकींचेही नुकसान झाले आहे. मंगळवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. कारमधील डिझेल चोरीचेच होते. याबाबत पळून गेलेल्या ‘त्या’ दोघांविरुद्ध लातूर ग्रामीण पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असून, वाहने जळाल्याबाबतही एपीआय सय्यद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आकस्मात जळिताची नोंद लातूर ग्रामीण पोलिसत करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)डिझेलने भरलेली कार कोणाची होती, पळून गेलेल्या त्या व्यक्ती कोण आहेत? याबाबत लातूर ग्रामीण पोलिस तपास करीत आहेत. एमएच १५ एबी १२०० या क्रमांकाची ही कार असल्याने संबंधित उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे याबाबत संपर्क साधण्यात येत असल्याचे एएसआय. सय्यद यांनी सांगितले.
गुन्ह्यातील कारसह पोलिस व्हॅन जळाली !
By admin | Updated: September 17, 2014 01:13 IST