औरंगाबाद : एका किरकोळ अदखलपात्र गुन्ह्यात अटक करण्याची धमकी देऊन आठ हजारांची लाच उकळणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी मंगळवारी रंगेहाथ अटक केली.विनोद कुंडलिक पदमणे (३०, रा. पिंपळवाडी, पैठण) असे त्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून, तो पैठण एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. या कारवाईबाबत पोलिसांनी सांगितले की, पैठण परिसरातील एका तरुणाविरुद्ध पैठण एमआयडीसी पोलीस ठाण्यात एका जणाने शिवीगाळ केल्याची तक्रार दिली होती. त्या तक्रारीवरून अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला होता. याचा तपास पोलीस नाईक विनोद पदमणे याच्याकडे होता. पदमणेने काल त्या तरुणाशी संपर्क साधला आणि ‘त्या गुन्ह्यात तुझ्याविरुद्ध चॅप्टर केस करतो. तुला अटक करून लॉकअपमध्येच टाकतो’ अशी धमकी दिली. अटक टाळायची असेल तर आठ हजार रुपये द्यावे लागतील, असे तो म्हणाला. त्या तरुणाने उद्या पैसे आणून देतो, असे आश्वासन पदमणेला दिले आणि तेथून थेट लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय गाठून तक्रार दिली. त्या तक्रारीवरून लाचलुचपतच्या पोलिसांनी पदमणेला पकडण्याची योजना आखली. ठरल्याप्रमाणे मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी पैठण एमआयडीसी ठाण्यात सापळा रचला. तक्रारदार तरुणाला आठ हजार रुपये घेऊन पदमणेकडे पाठविले. पदमणेने लाचेची रक्कम स्वीकारताच बाजूला दबा धरून बसलेल्या पोलिसांनी झडप मारून पदमणेला रंगेहाथ अटक केली. त्याच्याविरुद्ध पैठण एमआयडीसी ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक ब्रम्हा गिरी यांनी पैठण एमआयडीसी ठाण्याचा पदभार स्वीकारल्यापासून येथे लाच घेताना पोलिसाला पकडल्या जाण्याची ही तिसरी घटना आहे, हे विशेष.
आठ हजारांची लाच घेताना पोलीस पकडला
By admin | Updated: July 23, 2014 00:41 IST