लातूर : घरगुती सिलेंडरमधील गॅस काढून तो व्यावसायिक सिलिंडरमध्ये भरुन काळ्या बाजारात विक्री करणार्या चौघा आरोपींना रविवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता या चौघांनाही न्यायालयाने ३ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे़ लातुरातील मळवटी रोडवरील अनुसया गिरी पॅलेस इमारतीमधील एका गाळ्यात घरगुती सिलिंडरमधील गॅस काढून तो व्यावसायिक सिलिंडरमध्ये भरण्याचा गोरखधंदा सुरु होता़ त्याची माहिती स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांना मिळताच त्यांनी शनिवारी दुपारी ४़०५ च्या सुमारास अचानक धाड टाकली़ यावेळी दोन मोटारींच्या साह्याने घरगुती गॅस सिलिंडरमधील गॅस व्यावसायिक सिलिंडरमध्ये भरण्यात येत होते़ विशेष पथकाने २० भरलेले सिलिंडर, १२ रिकामे गॅस सिलेंडर, २ इलेक्ट्रिक मोटारी, एक इलेक्ट्रिक वजनकाटा, दोन पंखे, १ मालवाहू अॅपे, ५ गॅसचे कार्ड, १६ सिलिंडरची टोपणे जप्त केली़ एकूण २ लाख ४४ हजार ५०० रुपयांचे मुद्देमाल जप्त करण्यात आला़ याप्रकरणी शेषेराव शिवराम टिपरसे यांच्या फिर्यादीवरुन गांधी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन रघुवीर झिप्रे (पोचम्मा गल्ली, लातूर), महेश भारत साठे (गवळी गल्ली, लातूर), पठाण सूरजपाशा समशोद्दीन व नारायण बळीराम गायकवाड (दोघेही रा़ आष्टा, ता़ चाकूर) या चौघांना शनिवारी अटक केली़ या चौघांना रविवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले़ तेव्हा न्यायालयाने चौघांनाही ३ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे़ अधिक तपास स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक बी़ जी़ मिसाळ करीत आहेत़ (प्रतिनिधी)
घरगुती गॅसप्रकरणी चौघांना पोलिस कोठडी
By admin | Updated: June 2, 2014 00:50 IST