जीवनावश्यक वस्तू, औषधी दुकाने, रुग्णालये आदी सकाळपासून उघडी होती. हॉटेल चालकांना केवळ पार्सल सुविधेची परवानगी असल्यामुळे तेथेही अन्नपदार्थ नेण्यासाठी विविध ऑनलाइन कंपन्यांचे डिलिव्हरी बॉय उभे होते. पुंडलिकनगर रस्त्यावरील पानटपरीचालकाने कुणालाही न जुमानता टपरी सुरू ठेवल्याचे नजरेस पडले. यासोबतच कापड दुकानाचे शटर अर्धवट उघडे ठेवून व्यवसाय सुरू ठेवल्याचे दिसून आले.
===============
टिळकपथ, गुलमंडी, शहागंजमध्ये कडकडीत बंद
शाहगंज, सिटीचौक, टिळकपथ वरील एखाद्दुसरे दुकान वगळता सर्व बाजारपेठ कडकडीत बंद होती. टिळकपथवर फौजदार महादेव गायकवाड यांचे पथक गस्तीवर होते, तर शाहगंज आणि सिटीचौकात पोलीस अधिकारी, कर्मचारी होमगार्डच्या मदतीने विनामास्क नागरिकांवर दंडात्मक कारवाई करीत होते.
सकाळी ९ ते १०.३० माइकवरून सूचना
सिटीचौक पोलीस ठाण्याचे निरीक्षक संभाजी पवार आणि अन्य अधिकारी शहरात फिरून सकाळी ९ ते १०.३० दरम्यान लाउडस्पीकरवरून आवाहन करून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी व्यापाऱ्यांनी नियमाचे पालन करावे, असे आवाहन करीत होते. विनाकारण घराबाहेर पडू नका. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रत्येक नागरिकाने नियम पाळावेत असे आवाहन त्यांनी केले. त्यांच्या आवाहनाला व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देत सकाळपासून दुकाने बंद ठेवली.
२४ तासांत १५६ विनामास्क नागरिकांवर कारवाई
विनामास्क घराबाहेर फिरणाऱ्या नागरिकांवर पोलीस प्रशासनाकडून गुन्हे नोंदविणे आणि दंडात्मक कारवाई केली जात आहे. २४ तासांत १५६ नागरिकांवर कारवाई करून त्यांच्याकडून ७८ हजार रुपये दंड वसूल करण्यात आल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली.