औरंगाबाद : राज्यभरातील पेट्रोलपंपचालकांनी मंगळवारपासून बेमुदत संपाची हाक दिली होती; पण त्याआधी सोमवारीच पोळ्याच्या दिवशी वाहनधारकांची प्रचंड धावपळ झाली. संप सुरू होण्याआधी पेट्रोल, डिझेल भरून घेण्यासाठी सर्वच जण सरसावल्यामुळे पंपांवर वाहनांची तुफान गर्दी लोटली. त्यामुळे दुपारनंतर बहुतांश पेट्रोलपंप कोरडेठाक पडले. त्यानंतर पेट्रोलच्या शोधात अगदी पोळा फुटल्याप्रमाणे वाहनधारक एका पंपावरून दुसऱ्या पंपावर फिरत होते. दरम्यान, सायंकाळी उशिरा नियोजित संप स्थगित झाल्याची वार्ता येऊन धडकल्यामुळे वाहनधारकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. संपात जिल्ह्यातील सर्व १३५ पेट्रोलपंप सहभागी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे सोमवारी सकाळीच वाहनधारकांनी पेट्रोल, डिझेल भरण्यासाठी पंपांवर धाव घेतली. परिणामी सकाळपासूनच पंपांवर वाहनांच्या रांगा लागण्यास सुरुवात झाली. हळूहळू रांगा वाढू लागल्या. त्यामुळे दुपारपर्यंत सर्वच पंपांवर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. वाहनांची संख्या वाढल्यामुळे पंपांवरील साठाही संपण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला दुपारी १२ वाजेच्या सुमारास एमजीएम पेट्रोलपंप आणि सेव्हन हिल येथील पेट्रोलपंपांवरील साठा संपला. त्यानंतर एकापाठोपाठ एक पेट्रोल पंप ठप्प होत गेले. बीड बायपास, दिल्लीगेट, शिवाजीनगर, टीव्ही सेंटर, क्रांतीचौक, उल्कानगरी, बाबा पेट्रोलपंप, कडा कार्यालय असे जवळपास सर्वच पंप सायंकाळपर्यंत ‘ड्राय’ झाले. मात्र, सायंकाळनंतर काही पंपांवर पेट्रोल पुरवठ्याचे टँकर आल्यामुळे हे पंप पुन्हा सुरू झाले. त्यानंतर पुन्हा रांगा लागल्या. जालना रोडवरील राज पेट्रोलपंप, टीव्ही सेंटर येथील पोलिसांचा पेट्रोल पंप, बीड बायपास येथील म्हस्के पंपासमोर दोनशे मीटरपर्यंत रांगा लागल्याचे चित्र होते. 1संपाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी पेट्रोलपंपचालकांची बैठक बोलावली होती. ही बैठक सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आली होती. मात्र, दोघे तिघे वगळता पेट्रोलपंप असोसिएशनच्या इतर पदाधिकाऱ्यांनी या बैठकीकडे पाठ फिरविली. त्यामुळे ही बैठक गुंडाळावी लागली. त्यानंतर जिल्हा पुरवठा अधिकारी संजीव जाधवर यांनी पेट्रोल, डिझेल डीलर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना फोन करून संप काळातही रुग्णवाहिका, पोलिसांची वाहने, शासकीय वाहने, एसटी बसेस इ. अत्यावश्यक सेवांना इंधनाचा पुरवठा करण्याच्या सूचना दिल्या. पेट्रोल पंपांच्या संपाची माहिती सकाळीच वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झाली. त्यामुळे संप सुरू होण्याआधीच पेट्रोल, डिझेल भरण्यासाठी लोकांनी एकच घाई केली. दुपारनंतर एकेका पंपांवरील साठा संपत होता. तसतशी लोकांची धावाधाव वाढत होती. एकमेकांना फोनवरून कुठे गर्दी कमी आहे किंवा कुठल्या पंपांवर स्टॉक उपलब्ध आहे, याच्या सूचना लोकांकडून एकमेकांना दिल्या जात होत्या. सायंकाळनंतर ही धावपळ आणखीनच वाढल्याचे दिसून आले.
पंपावर फुटला ‘पोळा’!
By admin | Updated: August 26, 2014 01:51 IST