मोहन बारहाते, मानवत शहरातील एकाही भूखंडाचा नगर पालिकेच्या कारभार्यांनी विकास केलेला नाही. याबाबीकडे कारभार्यांचे कायमस्वरुपी दुर्लक्ष राहिले आहे. त्यामुळे लहान मुलांना खेळण्यासाठी जागाच नाही. मानवत शहराचा औरस-चौरस विस्तार झाला. या विस्तारात अनेक नवीन वसाहती निर्माण झाल्या. निर्माण झालेल्या वसाहतीपैकी अनेक वसाहती नगररचना विभागाकडून मान्यता घेऊन निर्माण झाल्या. तर काही अवैधरित्या निर्माण झाल्या. अवैधरित्या निर्माण झालेल्या वसाहतींवर नियंत्रण ठेवण्याचे काम नगर पालिकेचे असते. ज्या वसाहतीत नियमानुसार निर्माण झालेल्या असतात. त्या वसाहतीमध्ये नगर पालिकेला विकासकामांसाठी वसाहतीच्या एकूण क्षेत्रफळाच्या दहा टक्के क्षेत्रफळ उद्यानासाठी तर दहा टक्के क्षेत्रफळ अंतर्गत रस्ते व नाल्यांसाठी सोडावे लागते. या भागात नगरपालिकेने निधी टाकून वसाहतीतील उद्यानांचा विकास करण्याची गरज असते. परंतु मागील अनेक वर्षांपासून मानवत नगर पालिकेने शहरातील कोणत्याही नूतन वसाहतीतील भूखंडाचा विकास केलेला नाही. या भूखंडाच्या विकासात लहान मुलांना खेळण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या खेळण्या लॉन वृक्ष लागवड आदी बाबी येतात. परंतु शहरातील अनेक नूतन वसाहतींमध्ये त्यांना निर्माण होऊन दहा-दहा वर्षे होऊनही तिथे साधे रस्ते व नाल्या नाहीत. काही भागात तर अजूनही पिण्याचे पाणी पोहचणे बाकी आहे. तेव्हा या भूखंडाचा विकास करून शहरातील वसाहतीत उद्यान करणे, त्यात खेळण्या टाकणे, वृक्ष लागवड करणे आदी कामे न.प.चे कारभारी कधी मनावर घेणार या खरा प्रश्न आहे. शहरातील लहान लहान मुलांना त्यांच्या शारीरिक विकासासाठी खेळ हा आवश्यक असतो. खेळ म्हणजे मनोरंजन, नेतृत्व, शारीरिक विकास, आरोग्य आदींचे प्रतिक असते. त्यामुळे लहान मुलांना खेळण्यासाठी मैदानांची गरज असते. नुसती मैदाने असून चालत नाहीत तर ती मैदाने सर्वसोयींनीयुक्त असावी लागतात. परंतु नगर पालिकेच्या दुर्लक्षामुळे आजमितीस मानवत शहरातील एकाही भूखंडाचा विकास झालेला नाही. त्यामुळे लहान मुुलांचे मातीशी असणारे नाते तुटत चालले आहे. मुलांचा शारीरिक व मानसिक विकासही व्यवस्थितपणे होत नाही. भूखंडांचा विकास ही केवळ लहान मुलांचीच गरज आहे, असे नाही तर वृद्धांनाही सदपावली करण्यासाठी भूखंडांचा विकास सहाय्यभूत ठरणार आहे. त्यामुळे नगर पालिकेने या बाबीकडे लक्ष घालून शहरातील विविध नूतन वसाहतींमध्ये भूखंडाचा विकास करणे गरजेचे आहे. दूरदृष्टीचा अभाव नागरिकांकडून कधीही या विकासकामाबाबत नगरसेवकांकडे आग्रह धरल्या जात नाही. त्यामुळे जैसे थे स्थितीमध्ये मानवतमधील भूखंड दिसून येतात. नगर पालिकेवर निवडून गेल्यानंतर नगरसेवकांनी नगराच्या विकासासंबंधी विचारमंथन करून त्या दृष्टीने विकासकामे करण्याची गरज असते. परंतु निवडलेल्या नगरसेवकांकडून या कामांबाबत कधीही मौखिक चर्चा होताना दिसत नाही.
भूखंडांचा विकास नाही
By admin | Updated: May 16, 2014 00:18 IST