जालना : चोऱ्या, दरोडे, वाटमारी यासारख्या अनेक गुन्ह्यात पोलिसांना हवा असलेल्या राजसिंग श्यामसिंग कलानी (वय २१, रा. म्हाडा कॉलनी, सिरसवाडी रोड, जालना) या आरोपीस विशेष पोलिस पथकाने शुक्रवारी सायंकाळी अटक केली. आरोपीने घरात पुरून ठेवलेले काळ्या रंगाचे गावठी पिस्तोल पोलिसांनी जप्त केले.याबाबत अप्पर पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर यांनी सांगितले की, आरोपी राजसिंग याच्यावर शहर व परिसरातील पोलिस ठाण्यांमध्ये चोऱ्या, घरफोड्या, दरोड्याची काही गुन्हे दाखल आहेत. शहरातील विशाल कॉर्नर परिसरात आरोपीस विशेष पथकाच्या पोलिसांनी अटक केली. आरोपीची अधिक चौकशी केल्यानंतर अनेक गुन्हे करताना तो स्वत:जवळ एक गावठी पिस्तोल बाळगत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार त्याने घरात पुरून ठेवलेले पिस्तोल जप्त करण्यात आले. पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह, अप्पर पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर, सहाय्यक पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील डी.आर. चव्हाण, पी.एच. कुटे, ए.यू. फोके, एन.जी. पटेल, एम.बी. गायकवाड, डब्ल्यू. के. शेख आदींनी ही कारवाई केली.यावेळी तालुका जालना पोलिस ठाण्याचे निरीक्षक काळे, उपनिरीक्षक जगताप, ज्ञानदेव नागरे आदी उपस्थित होते.
जालन्यात पिस्तोलसह अट्टल गुन्हेगार गजाआड
By admin | Updated: April 12, 2015 00:48 IST