वडीगोद्री : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन स्वत:च्या पाचवर्षीय मुलास विहिरीत फेकून दिल्याची घटना २३ मे रोजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास अंबड तालुक्यातील डोणगांव दर्गा येथे घडली. या घटनेत मुलगा ठार झाला. दरम्यान, पोलिसांनी अवघ्या एका तासात आरोपी पित्यास गजाआड केले आहे. चारित्र्याच्या संशयावरून बाळासाहेब नेहमी पत्नीशी वाद करत होता. आठ दिवसांपूर्वी याच कारणावरुन बाळासाहेबाने पत्नीला माहेरी पाठवून दिले होते. २३ मे रोजी दुपारी दीड ते दोन वाजेच्या दरम्यान बाळासाहेबाने आपला मुलगा शरद (वय ५) याला सासुरवाडीत जाऊन मुलाला कोल्ड्रिंक्स देण्याचा बहाणा करुन तो तेथून त्याला घेऊन आला. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. पत्नीचे गावातीलच एका इसमाशी अनैतिक संबंध असल्याचा बाळासाहेब याचा संशय होता. या संशयातून त्याने मुलाला विहिरीत फेकून त्याचा खून केला. मात्र त्यानंतर बाळासाहेब याने स्वत: पोलिसांत खोटी तक्रार दाखल केली. या तक्रारीत त्याने म्हटले की, माझा मुलगा शरद व मी कोल्ड्रिंक्स पिण्यासाठी जात असताना रस्त्यामध्येच सिराज पठाण हा भेटला व त्याने मुलाला माझ्याकडून हिसकावून नेले. दरम्यान, घटनास्थळी अपर पोलिस अधीक्षक वसंत परदेशी, उपविभागीय अधिकारी विक्रांत देशमुख, पोलिस अधिकारी संदीपान कांबळे, गोंदी पोलिस ठाण्याचे एपीआय अशोक घोरबांड पोहचले. आणि अवघ्या एका तासातच तपासाचे सूत्रे हलवून खुनाचे बिंग फोडले. सिराज पठाण हाही घटना ज्या दिवशी घडली त्या दिवशी दिवसभर गावामध्ये नव्हता.बाळासाहेब ढाकणे याने खोटी तक्रार दिल्याचा संशय पोलिसांना आला होता. त्यामुळे त्यांनी चौकशीअंती एका तासातच खरा प्रकार समोर आणला. आरोपी बाळासाहेब याने पत्नीवर चारित्र्याचा संशय घेऊन आपण हे कृत्य केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीस अटक करण्यात आली आहे.
चिमुकल्यास विहिरीत फेकले; बाप गजाआड
By admin | Updated: May 25, 2014 01:04 IST