लातूर : तत्वज्ञान विषयाचे अभ्यासक प्राचार्य डॉ़ नागोराव कुंभार हे आपल्या ३९ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले आहेत़ त्यामुळे त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विद्यार्थ्यांनी कृतज्ञता सोहळा आयोजित केला आहे़ यानिमित्त ‘लोकमत’ने डॉ़ नागोराव कुंभार यांच्याविषयी असलेला शिक्षणक्षेत्रातील आदरभाव जाणून घेतला़ अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेऊन विद्यार्थ्यांना माणुसकीचे धडे देणारे प्राध्यापक, प्राचार्य म्हणून डॉ़ नागोराव कुंभार यांची ओळख आहे़ त्यांना प्राध्यापक, प्राचार्य म्हणून काम करीत असताना विद्यार्थ्यांना सदैव प्रेरणा देण्याचे काम केले़ तत्वज्ञान हा विषय भाकरीची व्यवस्था करणारा नसला तरी यातून माणूस कसा घडतो़ त्यांच्या दैनंदिन जीवनात वागावे, जगावे, बोलावे कसे याची शिकवण त्यांनी दिली़ विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञान देण्याबरोबरच त्यांनी संस्कार रूजविल्याने विद्यार्थ्यांमध्ये त्यांची लोकप्रियता कायम आहे़ मुखेड तालुक्यातील वसंतनगर येथे ग्रामीण महाविद्यालयात प्राचार्य म्हणून तीन वर्षे सेवा बजावली़ याठिकाणी त्यांनी उपेक्षित समाजघटकांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न केला़ लातूरच्या महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाची धुरा त्यांनी समर्थपणे सांभाळत शैक्षणिक दर्जा सुधारण्यासह महाविद्यालयाला त्यांनी उपक्रमशील बनविले़प्राचार्य डॉ़ नागोराव कुंभार हे तत्वज्ञान विषयाचे अभ्यासक आहेत़ त्यांनी ३९ वर्षे अध्यापनाचे कार्य केले़ माणसाला विवेकवादी बनविणारा विषय घेऊन त्यांनी विद्यार्थ्यांना विवेकबुध्दीने आदर्श जीवन जगण्याचा मंत्र दिला़ महात्मा गांधी यांचे विचार व कार्य हा त्यांचा चिंतनाचा विषय असून त्यांच्यावर त्याचा सखोल प्रभाव आहे़ शिक्षण क्षेत्रातील ध्येयवादी व्यक्तिमत्व म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो़ संस्कारक्षम मनावर अशा शिक्षकांचा सखोल प्रभाव पडतो़ प्राचार्य म्हणून त्यांनी केलेले काम हे आदर्श स्वरूपाचे आहे, असे मत माजी खा़ डॉ़ जनार्दन वाघमारे यांनी व्यक्त केले़ विचारशलाका या त्रैमासिकाच्या माध्यमातून राज्यभर वैचारिक खाद्य पुरविण्याचे काम केले़ यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली आहे़ तत्वज्ञान विषयाला न्याय देण्यासाठी त्यांनी खूप मोठा प्रयत्न केल्याचेही त्यांनी सांगितले़
विद्यार्थ्यांच्या मनात माणुसकी जगविणारे तत्वज्ञानाचे अभ्यासक
By admin | Updated: August 22, 2015 23:59 IST