परळी: तालुक्यातील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना शासन नियमाप्रमाणे मदत मिळाली नसल्यामुळे कन्हेरवाडी येथील राजाभाऊ फड यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात एक याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर २५ जुलै रोजी सुनावणी होणार आहे.या संदर्भात बोलताना राजाभाऊ फड म्हणाले, परळी तालुक्यातील गारपीटग्रस्त भागात झालेल्या नुकसानीचे फेरपंचनामे शासनाने करावेत, या उद्देशाने याचिका दाखल करण्यात आली आहे. तसेच शासन नियमाप्रमाणे गारपीटग्रस्तांना हेक्टरी मदत द्यावी, अशी मागणीही या याचिकेद्वारे उच्च न्यायालयाकडे करण्यात आली आहे. या प्रकरणात महसूल अधिकारी व राज्य शासन यांना पार्टी करण्यात आले आहे. दरम्यान, तीन महिन्यापूर्वी परळी तालुक्यातील अनेक गावांमध्ये गारपिटीचा पाऊस पडला होता. यामुळे तालुक्यातील फळबागांचे मोठे नुकसान झाले होते. अनेक ठिकाणची पिके उद्ध्वस्त झाली होती. त्यानंतर शासनाने पंचनामे केले होते. परळी तालुक्यातील नागापूर येथील अनेक गारपीटग्रस्त शेतकऱ्यांची नावे यादीमध्ये नाहीत, ही बाब समोर आली. त्यामुळे फेर पंचनामे करण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली आहे. गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळाली नसल्याचा आरोप भाजपाचे तालुकाध्यक्ष सुनील सोळंके यांनी केला आहे. (वार्ताहर)
गारपीटग्रस्तांना मदत मिळण्यासाठी याचिका दाखल
By admin | Updated: July 4, 2014 00:13 IST