लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांना प्रत्यक्ष भेटून तक्रार देण्यासाठी आलेल्या एका प्लॉटिंग व्यावसायिकाने आयुक्तांच्या कक्षासमोरच विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना गुरुवारी (दि.७) दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. यावेळी पोलीस आयुक्त कार्यालयात नव्हते. कर्मचाºयाच्या लक्षात हा प्रकार येताच त्यांनी त्यास घाटीत दाखल केले.शेख हनीफ शेख चुन्नू (रा. जयभीमनगर, टाऊन हॉल), असे विष प्राशन केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. शेख हनीफ याने शेख कैसर ऊर्फ गोटू तसेच इतरांकडून गतवर्षी नोटाबंदीच्या काळात पैसे उसने घेतले होते. त्या रकमेतून त्याने प्लॉट खरेदी केलेले आहेत. त्याने हे प्लॉट विक्रीसाठी काढले; परंतु त्यास ग्राहक मिळत नाही. मात्र, कर्जदारांनी त्याच्याकडे पैशासाठी तगादा लावला आहे. शेख कैसरसोबत गेल्या काही महिन्यांपासून त्यांचा वाद सुरू आहे. शेख कैसर हा सतत आपल्याला शिवीगाळ करून चारचौघांत अपमानित करीत असतो. त्याने काही दिवसांपूर्वी केलेल्या मारहाणीमुळे हनीफने सिटीचौक पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. तेव्हापासून कैसर हा अधिक त्रास देत आहे. त्याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे नमूद केलेला अर्ज घेऊन हनीफ गुरुवारी दुपारी फिनेल हे कीटकनाशक प्राशन करून पोलीस आयुक्तालयात आला. पोलीस आयुक्तांना भेटण्यासाठी त्यांच्या केबिनबाहेरील खुर्चीवर बसला. त्याने सोबत एका बाटलीत फिनेलही आणले होते. पोलीस आयुक्त कार्यालयात नव्हते. तो त्यांची प्रतीक्षा करीत असताना त्याने अचानक सोबत आणलेली फिनेलची बाटली तोंडाला लावली. काही वेळानंतर त्याने अचानक उलट्या करण्यास सुरुवात केली. ही बाब तेथील पोलिसांच्या लक्षात आली. त्यांनी त्यास पकडले. पोलिसांनी त्यास आत्महत्येचा प्रयत्न का करतो, असे विचारले असता तो म्हणाला, लोकांची देणी जास्त झालेली आहे आणि जवळ एक छदामही नसल्याने कर्ज फेडता येत नाही. त्यांच्याकडून पैशाचा तगादा वाढल्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. त्याचा अर्ज घेऊन पोलिसांनी त्यास तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल केले. बेगमपुरा पोलिसांनी त्याचा जबाब नोंदविला.
पोलीस आयुक्तांच्या केबिनसमोर एकाने केले कीटकनाशक प्राशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 00:55 IST