जालना : जालना व परभणी लोकसभा मतदारसंघात तुल्यबळ लढती रंगल्या. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लोकसभेची ही रंगीत तालीमच मानली जात होती. त्यामुळेच सत्तारूढ आमदारांसाठी ही सत्वपरीक्षा असल्याचा व्होरा राजकीय वर्तुळातून व्यक्त होत होता. परंतु १६ मे रोजी लागलेल्या ‘निकालात’ आघाडीचे लोकप्रतिनिधी सपशेल नापास झाले आहेत. विशेष म्हणजे गेल्या निवडणुकीत मताधिक्य दिलेल्या मतदारसंघांना यावेळी बरोबरीही राखता आली नाही. काही मतदारसंघात महायुतीला अभूतपूर्व मताधिक्य मिळाले. त्यामुळेच विधानसभेच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या निवडणुकांमध्ये आपल्या उमेदवारास आघाडी देण्यात हे लोकप्रतिनिधी अपयशी ठरल्याचे चित्र आहे. यावेळीच्या निवडणुकांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले होते. त्यामुळेच प्रमुख राजकीय पक्षांच्या मातब्बर पुढार्यांसह पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनी या निवडणुका गांभीर्याने घेतल्या. उमेदवारीसाठी मोठी रस्सीखेच केल्यानंतरसुद्धा यश-अपयश पत्करलेल्या या सर्वांनी लगेचच रुसवे-फुगवे, नाराजी, गटबाजी वगैरे बाबी बाजूला सारून पक्षासह अधिकृत उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे समर्थन उभे केले. आप-आपल्या कार्यक्षेत्रात ठाण मांडून लोकप्रतिनिधींनी आपला प्रभाव सिद्ध व्हावा, विरोधकांनी घूसखोरी करु नये यासाठी भक्कम व्यूहरचना केली. पाठोपाठ उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून ते बैठका, कॉर्नर सभा, मोठ्या सभा, संमेलने व रॅलींमधून जोरदार शक्तीप्रदर्शन व्हावे म्हणून, उमेदवारांच्या बरोबरीने सर्वार्थाने प्रयत्न केले. आप-आपल्या कार्यक्षेत्रात अल्पावधीतच सर्व माध्यमांचा उपयोग करीत, प्रचारयुद्ध पेटवून दिले. प्रचाराची राळ उडवून या सर्वांनी प्रतिस्पर्ध्यांना धडकी भरेल, असे तंत्र-मंत्रही वापरले. आपल्या कार्यक्षेत्रातून जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देण्याच्या वल्गना करण्यात आल्या तसेच मताधिक्यासाठी स्पर्धा रंगेल असे दावे छातीठोकपणे करण्यात आले. त्यामुळे काँग्रेस आघाडीच्या उमेदवारास प्रचंड मताधिक्य मिळेल, असे चित्र निर्माण झाले. त्यामुळे सर्वच मतदारसंघात वातावरण अक्षरश: ढवळून निघाले. मतदानाच्या दिवशीही लोकप्रतिनिधींनी आप-आपल्या कार्यक्षेत्रात ठाण मांडले. आपल्या कार्यक्षेत्रातून उमेदवाराला जास्तीत जास्त मताधिक्य मिळावे यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. परंतु निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर या सर्व लोकप्रतिनिधींसह राजकीय पुढार्यांचे पितळ उघडे पडले. काँग्रेस आघाडीच्या उमेदावाराला दारूण पराभव स्वीकारावा लागला. दरम्यान, विजयाच्या वल्गना केलेल्या आमदारांसह अन्य पदाधिकार्यांनी मतदानाचा वाढलेला टक्का आणि त्यानंतरची परिस्थिती ओळखून सावध भूमिका घेतल्या होत्या. (प्रतिनिधी) बदनापूर मतदारसंघातून आ. संतोष सांबरे ‘फर्स्ट क्लास’ बदनापूर विधानसभा मतदारसंघाने प्रत्येक लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुतीच्या बाजूनेच भरभरून कौल दिला आहे. याही निवडणुकीत या मतदारसंघाने महायुतीच्या पाठीशी भक्कम असे पाठबळ उभे केले. शिवसेनेचा बालेकिल्ला असणार्या व आ. संतोष सांबरे हे नेतृत्व करीत असणार्या या भागातून मोठे मताधिक्य अपेक्षितच होते. परंतु, आ. सांबरे यांनी मताधिक्य देण्यात कसूर केली नाही. सर्वाधिक असे ४६ हजार ९३१ एवढे मताधिक्य देऊन महायुतीच्या विजयास मोठा हातभार लावला. गेल्या २००९ च्या निवडणुकीत खा. दानवेंना येथून सुमारे ६ हजार ६८ एवढे मताधिक्य मिळाले होते. २००४ च्या निवडणुकीत दानवेंना १४ हजार ३२८, १९९९ च्या निवडणुकीत खा. दानवे यांना ११ हजार ४९५, १९९८ मध्ये युतीचे उमेदवार उत्तमसिंग पवार यांना ३ हजार २५१, १९९६ मध्ये युतीचे उत्तमसिंग पवार ३१ हजार ३३१, १९९१ मध्ये पुंडलिक हरि दानवे यांना ४ हजार ९१७ तर १९८९ च्या निवडणुकीत पुंडलिक हरि दानवे यांना १६ हजार ४६ एवढे मोठे मतधिक्य बदनापूर विधानसभेने दिले होते. या मतदारसंघातून १९९६ साली सर्वाधिक म्हणजे ३१ हजार ३३१ एवढे मोठे मताधिक्य युतीस मिळाले होते. या पार्श्वभूमीवर या निवडणुकीत या मतदारसंघाने महायुतीच्या बाजूने भक्कमपणे पाठबळ उभे केले. येथून खा. दानवे यांनी ओळीने चौथ्यांदा विजय मिळविताना आजवरचे सर्वाधिक म्हणजेच ४६ हजार ९३१ एवढे मताधिक्य मिळविले आहे. येथून दानवे यांना १ लाख ५ हजार ११ तर काँग्रेस आघाडीचे उमेदवार विलास औताडे यांना ५८ हजार ८० एवढी मते मिळाली आहेत.
लोकप्रतिनिधी सत्त्वपरीक्षेत ‘नापास’
By admin | Updated: May 20, 2014 01:06 IST