औरंगाबाद : जयभवानीनगरात कामगार व मजूर मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत. या भागात सेवा-सुविधांची बोंब असून, गुंठेवारीच्या नावाने मनपा सतत ठेंगा दाखवीत असल्याचा आरोप महिला व नागरिकांतून होत आहे. मुकुंदवाडी रेल्वेस्थानकाशेजारी राहणाऱ्या नागरिकांची दररोज रेल्वेगाड्यांनी झोप उडून जाते. त्यापेक्षा कमालीच्या अस्थिरतेचा भाव मनपाच्या उदासीन धोरणामुळे जाणवतो. पावसाळ्यात रस्त्यांवर चिखलाची दलदल गल्ली नं. १४, १५ मध्ये आहे. शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या विकास निधीतून सर्वांत महत्त्वाचा वाटणारा ड्रेनेजलाईनचा प्रश्न सुटल्याने अस्वच्छतेला बे्रक लागला आहे.इतर गल्ल्यांमधून सिमेंटचे पक्के रस्ते त्यांनी केल्याने वाहने सरळ घरापर्यंत आणता येतात; परंतु महानगरपालिका कॉलनी व नगरातील केरकचऱ्याची विल्हेवाट लावत नसल्याने रिकामे प्लॉट कचरा डेपोत रूपांतरित झाले आहेत. अस्वच्छतेचा कळस गाठला असला असून, मनपाचे औषध फवारणी करणारे कर्मचारी चुकूनही या भागात फिरकत नाहीत. पाच ते दहा व्यक्तींना डेंग्यूमुळे नुकतेच खाजगी दवाखान्यात उपचार घ्यावे लागले आहेत. टँकरच्या पाण्यावरच नागरिकांना अवलंबून राहावे लागत आहे. आगाऊ पैसे भरूनही टँकर वेळेवर येत नाही. मूलभूत समस्या सोडवाव्यात, अशी मागणी शहाजी रंजवे, पांडुरंग जाधव, भगवान विसपुते, संतोष देशपांडे, श्रीराम राठोड, अर्चना चोपडा, नरेंद्र आटोटे, भास्कर अंबिलढगे, रवी सातदिवे, आशा कांबळे, लहू जाधव, सुमनबाई येरकुंडे, ज्योती जाधव, रुख्मिणी श्रीरामकर, सुनीता जाधव, सुनीता चव्हाण, मीराताई रणधीर, सीता हिरडे, विमल एंगडे, सूर्यकांत गजरे, मंगल थोरात इ. नागरिकांनी केली आहे.
डास व दुर्गंधीने जनता झाली हैराण
By admin | Updated: August 26, 2014 01:52 IST