निलंगा : तालुक्यातील सायखान चिंचोली येथील १२ शेतकऱ्यांनी खरेदी केलेले ज्वारीचे बियाणे निकृष्ट निघाल्याने सबंधित बियाणे कंपनीला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने दंड ठोठावला आहे़ तसेच शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत़ चिंचोली येथील काही शेतकऱ्यांनी खरीप हंगाम २०१० साठी ज्वारीचे (हायब्रीड) बियाणे खरेदी करून पेरा केला होता़ मात्र, ते बियाणे उगवले पण कंपनीने ठरवून दिलेल्या मुदतीत सदर ज्वारीच्या पिकास कणीस बाहेर पडले नाही़ पिकाची वाढ झाली नाही त्यामुळे तक्रारदारांनी लातूर जिल्हा ग्राहक मंचकडे तक्रार दाखल केली़ औरंगाबाद येथील व्हर्जीन सीड कंपनीच्या विरूध्द २७ एप्रिल २०११ साली तक्रार दाखल केल्यानंतर अर्जदार व गैरअर्जदार यांचे म्हणणे ऐकुन घेतले़ २९ नोव्हेंबर २०१४ रोजी शेतकऱ्यांची तक्रार अंशता मंजूर केली़ शेतकरी विजयकुमार नाठकरे, सूर्यकांत धुळाप्पा बिराजदार, गोविंद किसनराव पाटील, शंकर बसप्पा थोंटे, रियाजमियाँ सरदारमियाँ सरकारवाले यांना ओम फर्टीलायझर भुतमुगळी यांच्याकडून प्रत्येकी २ हजार व व्हर्जीन सीड कपंनीकडून प्रत्येकी ३ हजार दंड तर बहादुरशहा पाशासाहेब पटेल, लोचनाबाई खंडू मोरे व गफार महेबुब शेख यांना ओम फर्टिलायझरकडून प्रत्येकी ४ हजार व व्हर्जीन कंपनीने प्रत्येकी ६ हजार दंड शेतकऱ्यांना द्यावा, असा निकाल ग्राहक मंचने दिला आहे़ तसेच मानसिक त्रासापोटी शेतकऱ्यांना प्रत्येकी ६ रूपये देण्याचे आदेशही बजावण्यात आले आहेत़ तसेच मुन्सी महेबुब पटेल, सुबानी महेतासाब, अब्दुल अलीम बिराजदार यांच्या तक्रारीनुसार विक्रेता होळकर कृषी सेवा केंद्र यांच्याकडून प्रत्येक बियाच्या पिशवीस दोन हजार व व्हर्जीन सीड कंपनीकडून प्रत्येकी ३ हजार व मानसिक त्रासापोटी प्रत्येकास ६ हजार रूपये दंड ३० दिवसांच्या आत देण्याचे आदेश ग्राहक मंचच्या अध्यक्ष श्रीमती ए़जी़सातपुते यांनी दिले आहेत़ तक्रारदाराकडून अॅड़ के़व्ही़पंढरीकर, अॅड़ ए़ए़हत्ते यांनी काम पाहिले़ (वार्ताहर)
बोगस बियाणे देणाऱ्या कंपनीस दंड
By admin | Updated: December 31, 2014 01:02 IST