व्यंकटेश वैष्णव , बीडरुग्णालयात रुग्ण घेवून आलेल्या नातेवाईकांना तारेवरची कसरत करावी लागते. उपचार मिळण्या ऐवजी मनस्तापच सहन करण्याची वेळ त्यांच्यावर येत आहे. रुग्ण दाखल केल्या नंतर रुग्णाच्या नातेवाईकांना स्ट्रेचर ओढण्यापासून ते सलायनचे स्टँड शोधण्यापर्यंतंची कामे करावी लागत असल्याचे चित्र गुरूवारी रुग्णालयात पहावयास मिळाले.स्वच्छ प्रशासन चालवत असल्याचा आव आणणाऱ्या प्रमुख अधिकाऱ्यांना ही रुग्णाची होत असलेली हेळसांड दिसत नाही का? असा प्रश्न रुग्णांच्या नातेवाईकांनी उपस्थित केला आहे. जिल्हा रुग्णालयात आरोग्य सेवेचा पूर्णत: बोजवारा उडाला आहे. ऐन दुष्काळात गोरगरीब रुग्णांची हेळसांड होत आहे. ग्रामीण भागातील रुग्णालयांना तर समस्यांची घरघर लागली आहे.जिल्हा रुग्णालयात एकूण २०९ चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांची पदे मंजूर आहेत. यातील १७२ कर्मचारी प्रत्यक्षात कार्यरत आहेत. बीड शहराच्या पंचेवीस ते तीस किलो मीटर अंतरावर होणाऱ्या अपघातांचे प्रमाण अधिक आहे. अपघाताचे रुग्ण जिल्हा रुग्णालयात आल्या नंतर येथे केवळ पाच खाटांचा अपघात कक्ष तयार केलेला आहे. दोन दिवसापूर्वी मांजरसुंबा नजीक पालीच्या घाटात उसतोड मजूरांचा ट्रॅक्टर उलटला होता. या अपघातात अकरा उसतोड मजूर जखमी झाले होते. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केल्या नंतर अक्षरश: उपचार करण्यासाठी खाटा उपलब्ध नव्हत्या. असे प्रकार रोजच येथे घडत असल्याने हे जिल्हा रुग्णालय नव्हे वेदनालय म्हणण्याची वेळ रुग्णांवर आली असल्याचे दिसून येत आहे.
रुग्णांच्या नातेवाईकांची कसरत
By admin | Updated: April 1, 2016 01:11 IST