औरंगाबाद : रेमडेसिविर इंजेक्शनसाठी रुग्ण नातलगांची धावपळ सुरू झाली आहे. औरंगाबादमध्ये कुठेही इंजेक्शन उपलब्ध नसल्याने रुग्णांचे नातलग हताश झाले होते, तर एफडीएच्या अधिकाऱ्यांना देखील नातलगांना तोंड द्यावे लागले. बुधवारी २ हजार इंजेक्शन्सचा साठा शहरात घेऊन येणारे वाहन सायंकाळपर्यंत आले नव्हते. त्यामुळे अधिकाऱ्यांना हताश होण्यापलीकडे काहीही करता आले नाही.
घाटी रुग्णालयात असलेल्या साठ्यातून एमजीएम आणि धूत हॉस्पिटलसाठी काही इंजेक्शन्स पाठविण्यात आली. इतर खासगी रुग्णालयांमधील रुग्णांना इंजेक्शनची गरज असताना, त्यांना ती मिळू शकली नाहीत. शहरात कुठेही हे इंजेक्शन मिळत नसल्याचे रुग्ण नातेवाईकांकडून सांगण्यात आले. इंजेक्शनसाठी नातेवाईकांची धावपळ सुरू होती.
मराठवाडा, नाशिक, धुळे, चाळीसगावमधून रुग्ण नातलगांनी येथील एफडीएच्या अधिकाऱ्यांना भेटून इंजेक्शनची मागणी केली. औरंगाबादेत इंजेक्शनचा साठा आहे, त्यामुळे येथे आल्याचे काही जणांनी एफडीएच्या अधिकाऱ्यांना सांगितले.
घाटी व इतर मोठे हॉस्पिटल वगळता इतर खासगी कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असणाऱ्या रुग्णांच्या यादी आणि मागणीनुसार हे इंजेक्शन घाटीच्या मेडिसीन विभागातून देण्यात येते. परंतु बुधवारी मागणी वाढल्यामुळे इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला.
दरावरून खरेदी रखडल्याची चर्चा
शासनाने इंजेक्शन खरेदी करून त्याचा पुरवठा करणे गरजेचे आहे. परंतु एका कंपनीने दिलेले दर शासनाला जास्त वाटत असल्यामुळे खरेदी रखडल्याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात सुरू आहे. दरम्यान, या सगळ्या खरेदी-विक्रीच्या वाटाघाटीत रुग्णांची हेळसांड आणि नातेवाईकांची धावपळ होत आहे.
जिल्हाधिकाऱ्यांची माहिती अशी...
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना याप्रकरणी संपर्क केला असता त्यांनी सांगितले, घाटी, सिव्हिल आणि मनपाकडे साठा आहे. मोठ्या हॉस्पिटल्सना उसनवारीने इंजेक्शन्स दिली आहेत. २ हजार इंजेक्शन दिले आहेत. कोविड हॉस्पिटलकडून मागणी असलेले पत्र घेऊन येताच इंजेक्शन देण्यात येत आहे. २ हजार इंजेक्शनचा साठा उद्यापर्यंत मिळेल, असा दावा त्यांनी केला.