वलांडी : देवणी तालुक्यातील हेळंब येथील खून प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे़ आर्थिक व्यवहारातून मित्रानेच मित्राला संपविल्याचे तपासातून समोर आले़ आरोपीस अटक करुन पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले असता त्यास पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़हेळंब येथील ग्रामपंचायतीचे आॅपरेटर सुभाष पांचाळ यांचा २ एप्रिल रोजी सायंकाळी खून झाल्याचे उघड झाले होते़ त्याअनुषंगाने देवणी पोलिसांत मयताच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता़ या गुन्ह्याचा तपास करताना देवणी पोलिसांनी मयताची घरात मिळालेल्या आर्थिक व्यवहाराच्या कागदपत्रांवरुन तपासाची चक्रे गतीमान केली़ तेव्हा या प्रकरणात मयताचा मित्र धनाजी चंदरराव सावंत याचे नाव समोर येऊ लागले़ त्याअनुषंगाने चौकशी केली असता, धनाजी घटना घडल्यादिवशी पैसे मागण्यासाठी सुभाषच्या घरी गेल्याचे निष्पन्न झाले़ यापूर्वीही त्याचे आर्थिक व्यवहार सुरु होते़ धनाजीकडे एकूण १ लाख २५ हजार रुपये सुभाषचे येणे होते़ या व्यवहारातूनच धनाजीने त्या दिवशी सुभाष शेतात झोपलेला असताना कुऱ्हाडीचे घाव घालून त्याचा खून केला़ पोलिसांनी कसून चौकशी केली असता आरोपीने खुनाची कबुली दिली असून, घरात लपवून ठेवलेले रक्ताने माखलेले शर्टही काढून पोलिसांनी जप्त केले़ आरोपी धनाजी सावंत यास पोलिसांनी अटक करुन न्यायालयासमोर हजर केले़ यावेळी न्यायालयाने त्यास १० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़ पुढील तपास देवणी पोलीस करीत आहेत़(वार्ताहर)
दोस्तीपुढे पैैसा नडला; खुनाचा झाला उलगडा
By admin | Updated: April 10, 2015 00:28 IST