घनसावंगी : तालुक्यातील आरगडे गव्हाण येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना पोषण आहार निकृष्ट दर्जाचा देण्यात येत असल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांमधून होत होत्या. पालकांनीही विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून थेट शाळा गाठली अन् आहाराचा पंचनामा केला.विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पोषण आहारातील दाळी, वटाणे, तांदूळ व इतर साहित्याच्या दर्जाचा पंचनामा पालकांनी केला. सदर साहित्य अत्यंत निकृष्ट असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. काही साहित्याचे नमुने गटशिक्षाधिकारी यांनाही दाखविण्यात आले.अरगडे गव्हाण येथे पहिली ते पाचवी पर्यंत शाळा आहे. १२० विद्यार्थ्यांना दररोज पोषण आहार दिला जातो. मात्र आहार खराब असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे होते. पालक शिवराम गुजर, गजानन गुजर, किरण पिसुळे यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली. गटशिक्षणाधिकारी भागवत म्हणाले, खाद्यान्नाचे नमुने अन्न व औषधी प्रशासनाकडे पाठविण्यात येणार आहे. अहवाल प्राप्त झाल्यावर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.
पोषण आहाराचा पालकांनी केला पंचनामा
By admin | Updated: August 22, 2015 23:55 IST