लातूर : १४ वर्षांपूर्वी सरकारी नोकरीतून निवृत्ती़़़ वयाची सत्तरी ओलांडलेली़़़ पांडुरंगाच्या मर्जीने सर्वकाही सुखनैव सुरु़़़तरीही ‘त्यांना’ विठ्ठलाची ओढ स्वस्थ बसू देत नाही़ अगदी ७३ व्या वर्षीही ते सपत्निक पायी वारी न चुकता करतात़ त्यांच्या या पायी वारीची यंदा द्विदशकपूर्ती झाली आहे़प्रल्हाद चौधरी (वय ७३) व मधुमती चौधरी (वय ६७) असे या दाम्पत्याचे नाव आहे़ मूळचे चौधरी कुटूंब हे चाकूर तालुक्यातील आष्ट्याचे़ परंतु, त्यांची आज चौथी पिढी लातुरातच वाढते आहे़ शहरी संस्कृतीत वाढतानाही त्यांनी पिढीजात मिळालेले संस्कार टिकवून ठेवले आहेत़ हे कुटूंबच मुळात वारकरी सांप्रदायातील़ प्रल्हाद चौधरी यांना कळते तसे त्यांचे आजोबा नारायणराव व पुढे वडील पुंडलिकराव हे विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी वारी करीत़ यादरम्यान, प्रल्हाद चौधरी हे लातुरातच लहानाचे मोठे झाले़ येथेच सरकारी नोकरीतही लागले़ लातूरच्या शासकीय रुग्णालयात कार्यालयीन अधीक्षक म्हणून कार्यरत असतानाच त्यांनी १९९५ साली पायी वारीचा मनोदय सहचारिणी मधुमती चौधरी यांच्याकडे बोलून दाखविला़ त्यांनी लगेचच होकार दिल्याने त्याच वर्षापासून पायी वारी सुरु केली़ यंदा या वारीला २० वर्षे पूर्ण होत आहेत़ यादरम्यान, या दाम्पत्याने एकदाही वारी चुकविलेली नाही़ आजारी, पाय सुजलेल्या स्थितीतही त्यांनी वारी सोडली नाही़ ‘तो विठ्ठलच आमच्यात एक उर्जा देतो, जी त्याच्यापर्यंत पोहोचविण्यात कोणतेही अडथळे येऊ देत नाही़ याला चमत्कार म्हणावा की त्या विठ्ठलाची भक्तांप्रती असलेली काळजी, हे तोच जाणो’, असे भक्तीपूर्ण उद्गार प्रल्हाद चौधरी यांनी काढले़ ते दिंडीसह मंगळवारीच पंढरपुरात दाखल झाले आहेत़ पांडुरंगाच्या भेटीची आस लागलेल्या चौधरी दाम्पत्याने तिथल्या गर्दीतून एक नवी उर्जा मिळत असल्याचे सांगतानाच ती वर्षभर आमच्यासोबत कायम असते, असेही सांगितले़
पांडुरंगाच्या भेटीची लागली आस
By admin | Updated: July 9, 2014 00:32 IST