जालना : जिल्ह्याची प्रति पंढरी म्हणून ओळख असलेल्या श्री आनंदीस्वामी महाराजांच्या पालखी सोहळ्यास वेगळे असे महत्त्व आहे. या पालखी सोहळ्याचे मुस्लिम बांधवांसह सर्व जण मोठ्या भक्तिभावाने स्वागत करतात. या स्वागतातूनच सर्वधर्मसमभाव व अखंडतेचा संदेश मिळतो. प्राचीन परंपरा असलेल्या पालखी सोहळ्याचे बाजार चौक व जामा मशीद परिसरात मुस्लिम बांधवांकडून स्वागत करण्यात येते. बाजार चौकी परिसरात शहाआलमखान यांच्यासह इकबाल पाशा, सगीर अहमद यांच्याकडून स्वागत करण्यात येते. याविषयी अधिक माहिती देताना उपनगराध्यक्ष शाह आलम खान म्हणाले, पालखी सोहळ्याचे स्वागत करण्याचे आमचे यंदाचे २७ वे वर्ष आहे. आनंदीस्वामी पालखी सोहळ्यातील प्रमुखांचे हार, शाल देऊन यथोचित सत्कार करण्यात येतो. हा सत्कार करताना आम्हाला अतिशय आनंद होतो. एकता व अखंडतेचा संदेश यातून जात असल्याचे खान सांगतात. जामा मशीद परिसरात शेख अख्तर दादामिया यांच्याकडूनही स्वागत करण्यात येते. त्यांचे १८ वे वर्ष आहे. स्वागतासोबतच पालखीतील भाविकांना अल्पोपहाराचे वाटप केले जाते. हिंदू- मुस्लिम बांधवांमध्ये प्रेम व अखंडता वाढावी म्हणून आम्ही ही परंपरा सुरु केल्याचे अख्तर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
पालखीतून सर्वधर्मसमभावचा संदेश
By admin | Updated: July 27, 2015 01:09 IST