औरंगाबाद : गेल्या काही वर्षांपासून प्रतीक्षा असलेल्या औरंगाबाद- अजिंठा- फर्दापूर आणि औरंगाबाद- पैठण रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. या दोन्ही रस्त्यांच्या चौपदरीकरणानंतर पैठण- अजिंठा हे अंतर अवघ्या अडीच ते तीन तासांत कापता येणे शक्य होईल. त्यामुळे आगामी कालावधीत तीर्थक्षेत्र, जायकवाडी धरण, ज्ञानेश्वर उद्यान आणि जगप्रसिद्ध अजिंठा लेणी या दोन ठिकाणी कमी वेळेत जाण्यासाठी सर्वसामान्य वाहनधारकांबरोबर देश- विदेशातील पर्यटकांना मोठी सुविधा होणार आहे. औरंगाबाद- अजिंठा- फर्दापूर आणि औरंगाबाद- पैठण रस्त्यांवर टोल आकारणी करून बीओटी तत्त्वावर त्यांचा विकास करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधांच्या उपसमितीने बुधवारी मंजुरी दिली. औरंगाबाद- अजिंठा- फर्दापूर या ९९ कि.मी. रस्त्याचा ७७५ कोटी रुपये खर्च करून विकास करण्यात येणार आहे. त्याचबरोबर औरंगाबाद- पैठण या ४५ कि.मी. रस्त्याचा २३९ कोटी रुपये खर्च करून विकास करण्यात येईल. औरंगाबादपासून काही अंतरावर असलेले पैठण शहर तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते. जगप्रसिद्ध वेरुळ, अजिंठा लेणी, दौलताबाद आणि औरंगाबाद शहरातील पर्यटनस्थळांबरोबरच एक पर्यनस्थळ म्हणून पैठण येथेही पर्यटकांची गर्दी असते. शिवाय, जायकवाडी धरण, ज्ञानेश्वर उद्यान यासाठी पैठण प्रसिद्ध आहे. पैठण आणि चितेगावची औद्योगिक वसाहतही आहे. त्यामुळे औरंगाबाद- पैठण रस्ता वाहतुकीसाठी महत्त्वाचा ठरतो; परंतु गेल्या काही वर्षांत या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. मृत्यूचा महामार्ग म्हणून रस्त्याची ओळख निर्माण होत आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून रस्त्याच्या चौपदरीकरणाची प्रतीक्षा वाहनधारकांना लागली आहे, तर दुसरीकडे औरंगाबाद- अजिंठा रस्ता सध्या दोन पदरी असून अनेक ठिकाणी वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. जगप्रसिद्ध अजिंठा लेणी पाहण्यासाठी देश- विदेशातून दरवर्षी लाखो पर्यटक येतात. त्यामुळे औरंगाबाद- फर्दापूर हा रस्ता पर्यटकांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा ठरतो; परंतु अरुंद रस्ता, विविध ठिकाणी असलेल्या गावांमुळे वाहतुकीस ठिकठिकाणी अडथळा येतो. त्यामुळे पर्यटकांना कमी वेळेत या ठिकाणी पोहोचण्यासाठी अडचणी येतात.२०१६ अखेरीस पूर्णबांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्त्वावर हे प्रकल्प राबविण्यात येत आहेत. यामध्ये राज्य आणि केंद्राच्या निधीचा वाटा असेल. या प्रकल्पांच्या निविदांना मान्यता देण्यात आल्यानंतर आता त्यांना केंद्रांची मंजुरी मिळण्याची प्रतीक्षा करावी लागेल. दोन्ही प्रकल्पांत केंदाचा २० टक्के निधीचा वाटा आहे. केंद्राची मंजुरी मिळण्यास कोणतीही अडचण नाही. त्यामुळे लवकरच संबंधित प्रकल्पांच्या कंत्राटदरांना वर्क आर्डर मिळेल; परंतु आचारसंहितेची अडचण येऊ शकते का? याकडे बघावे लागेल, अशी माहिती जागतिक बँक प्रकल्पाच्या सूत्रांनी दिली. औरंगाबाद- अजिंठा- फर्दापूर आणि औरंगाबाद- पैठण रस्त्याचे काम करण्याचा कालावधी दोन वर्षांचा राहणार आहे. त्यामुळे २०१६ च्या अखेरीस दोन्ही रस्ते पूर्ण होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. औरंगाबादहून अजिंठ्याला जाण्यासाठी सध्या जवळपास अडीच तास लागतात; परंतु औरंगाबाद- अजिंठा- फर्दापूर या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर औरंगाबादहून अजिंठ्याला अवघ्या दीड तासात पोहोचणे शक्य होणार आहे. औरंगाबाद- पैठण मार्गाचे चौपदीकरण झाल्यानंतर औरंगाबादहून अवघ्या ४५ मिनिट ते एक तासात पैठण गाठता येईल. त्यामुळे पैठण- अजिंठा हे अंतर तीन तासांत कापणे शक्य होईल.या रस्त्यांवर वेळोवेळी वाहतुकीच्या कोंडीच्या समस्येला वाहनधारकांना सामोरे जावे लागते. चौपदीरकरणानंतर ही समस्या कायमची थांबेल. त्यामुळे वाहनधारकांच्या वेळेची बचत होईल. शिवाय, इंधनाचीही मोठी बचत होईल.
पैठण-अजिंठा ३ तासांत
By admin | Updated: September 5, 2014 00:53 IST