भोकरदन : मराठवाडा व विदर्भाच्या सिमेवर असलेल्या पदमावती मध्यम प्रकल्पातील पाणी चोरी कोणी थांबवायची यांचा ताळमेळ लागत नसल्यामुळे मध्यम प्रकल्प कोरडा पडण्याच्या मार्गावर आला आहे. धरण कोरडे झाल्यावर वालसांवगी, पारध बु, पारध खुर्द, वाढोणा या भोकरदन तालुक्यातील गावासह बुलडाणा व चिखली तालुक्यातील मासरूळ, धामणगाव, तराडेखड, देऊळघाट, सोयगाव, गुम्मी या गावावर भीषण पाणीटंचाईचे संकट उभे राहण्याची शक्यता निर्माण झाली असल्याने वालसांवगी, पारध बु, व वाढोण्याचे सरपंच तीव्र अंदोलनाच्या पवित्र्यात आहेत़तालुक्यातील पदमावती व चिखली तालुक्यातील मासरूळ या दोन्ही गावाच्या सिमेवर हा मध्यम प्रकल्प झालेला असून, लघु पाटंबधारे विभाग चिखली अर्तगत या प्रकल्पाचे काम करण्यात आलेले असल्यामुळे विदर्भाच्या अर्तगत येतो. मात्र या प्रकल्पासाठी भोकरदन तालुक्यातील शेतकऱ्याच्या जमिनी मोठ्या प्रमाणात गेलेल्या आहेत. शिवाय पदमावती या गावाचे पुनर्वसन सुध्दा करावे लागले होते. या प्रकल्पावरून भोकरदन तालुक्यातील पारध खुर्द, पारध बु, वालसांवगी, वाढोणा, पदमावती या गावासाठी पाणी पुरवठा योजनाचे काम करण्यात आलेले असून, त्या द्वारे गावातील नागरिकांना पाणी पुरवठा करण्यात येत आहे. मात्र या वर्षी धरणामध्ये ८० टक्के पाणी साठा असताना सुध्दा एप्रिलच्या १९ तारखेलाच मृतसाठ्याएवढेच पाणी या राहिल्याने या धरणातील आणखी पंधरा दिवस पाणी चोरी सुरूच राहिली, तर धरण कोरडे पडणार आहे. मात्र, त्यानंतर या धरणावरून पाणी पुरवठा असलेल्या गावात तीव्र पाणी टंचाई निर्माण होणार आहे़ या धरणातून पाणी चोरी करणारे शेतकरी सुध्दा याच गावातील आहेत. मात्र त्याना पाणीचोरी करण्यापासून कोणी रोखावे असा प्रश्न उपस्थित होत आहे. आजही ७० ते ८० विद्युत पंपाद्वारे पाणी चोरी सुरू आहे़या धरणातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्यासाठी १० जानेवारी रोजी चिखली येथील लघु पांटबंधारे उपविभागाचे सहाय्यक अंभियत्याने या परिसरातील विज पुरवठा बंद करण्या संदर्भात उपअभियंता विजवितरणला पत्र दिलेले आहे. त्यानंतर ३ फेबु्रवारी रोजी भोकरदनच्या तहसिलदारांनी सुध्दा वीजपुरवठा खंडीत करण्यासाठी पत्र दिले आहे.त्यानंतर महावितरणच्या वतीने एल टी लाईनचा पुरवठा बंद केला होता. मात्र या परिसरातील रोहित्राचा पुरवठा सुरूच ठेवल्याने पाणी चोरी सर्रास सुरू आहे. या भागातील विजपुरवठा खंडीत करण्यासाठी सर्व विभागाने एकत्र येऊन कार्यवाही करण्याची गरज असल्याने अधिकाऱ्यानी सुध्दा याकडे दुर्लक्ष केल्यामुळे धरण कोरडे पडण्याच्या मार्गावर आहे़ (वार्ताहर)
मराठवाड्याच्या सीमेवरील पद्मावती प्रकल्प कोरडा पडण्याच्या मार्गावर!
By admin | Updated: April 19, 2016 01:08 IST