भारज: जाफराबाद तालुक्यातील भारज गावात पाणंदमुक्ती अभियान राबविण्यात आल्याने लोकसहभागातून रस्त्यांनी कात टाकली आहे. शेतात जाणारे रस्ते आता गुळगुळीत झाल्याने शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत. शेतात जाण्यासाठी नेहमीच रस्त्यांचा प्रश्न उभा राहत होता. जो रस्ता आहे. तो झाडा-झुडपांनी व्यापलेला, रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ता? असा प्रश्न नेहमीच पडायचा. पावसाळ्यात तर या रस्त्यावरून पायी चालणेही कठीण होत असे. त्यातच शासनाच्या पाणंदमुक्ती अभियानाला लोकसहभागाची साथ मिळाल्याने पाणंद रस्ते कात टाकत आहेत. भारज परिसरातील आडा ते भातोडी या पाणंद रस्त्याचे काम यातूनच करण्यात आल्याने तो रस्ता आता गुळगुळीत झाला आहे. त्यामुळे भारज आडा, व भातोडी या तिन्ही गावांतील अनेक शेतकऱ्यांचा शेतात जाण्याच्या रस्त्याचा प्रश्न सुटला आहे. आता शेतातील माल थेट बाजारपेठेपर्यंत नेण्यासाठी वाहने शेतात येतील. त्यामुळे शेतकऱ्यांनी केलेली मेहनत वाया जाणार नाही. तसेच त्यांचा खर्चही वाचणार असल्याने शेतकरी आनंदी आहे. तीर्थपुरीतही रस्तातीर्थपुरी येथील शेतकऱ्यांनी तीर्थपुरी ते जोगलादेवी हा रस्ता लोकवर्गणीतून तयार केला असल्याने त्या भागातील शेतकऱ्यांचा शेतीला जाण्यासाठीचा प्रश्न निकाली निघाला आहे. तीर्थपुरी येथील जि. प. शाळेच्या जवळून जुना जोगलादेवी रस्ता असून या रस्त्याने पावसाळ्यात शेतात जाण्यासाठी चिखलाचा त्रास सहन करावा लागत होता.शेतकऱ्यांनी १ लाख ५ हजार रुपये लोकवर्गणी करुन दीड कि.मी. अंतराचा रस्ता तयार केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह जनावरांचा मार्ग मोकळा झाला.लोकवर्गणी जमा करणे तसेच शेतकऱ्यांची मानसिकता बदलण्यासाठी गावातील बालासाहेब केसकर, गणेश बोबडे, शिवाजी मुक्ताराम बोबडे, महादेव चिमणे, संजय बोबडे, मुकेश वैद्य यांनी परिश्रम घेतले. आता मात्र इतरांनी हा आदर्श घ्यावा.अनेक शेतकऱ्यांना लाभ जाफराबाद तालुक्यातील भारज परिसरातील अनेक मुख्य रस्त्यांची मोठी दुरवस्था झालेली आहे. या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने नेहमीच दुर्लक्ष कलेले आहे. या रस्त्यांचा प्रश्न कायम असताना ग्रामस्थांनी पाणंदमुक्ती अभियानाच्या माध्यमातून आडा, भारज ते भातोडी पांदण रस्त्याचे काम केले. त्यामुळे या तीन गावांतील ग्रामस्थांचा रस्त्याचा प्रश्न निकाली निघाला आहे.
पांदण रस्त्याने टाकली कात
By admin | Updated: July 13, 2014 00:19 IST