लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मराठवाड्यातील १३ वे अवयवदान मंगळवारी (दि. १५) औरंगाबादेत पार पडले. दुचाकीवरून पडून गंभीर जखमी होऊन ब्रेन डेड झालेल्या अंगणवाडी शिक्षिकेच्या अवयवदानाने तिघांना नवीन आयुष्य तर दोघांना दृष्टी मिळाली आहे.रत्नमाला बाळासाहेब निनाळे (५०, रा. चौसाळा, जि. बीड) असे अवयवदात्या महिलेचे नाव आहे. १३ आॅगस्ट रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास मुलगा प्रवीण निनाळे यांच्यासोबत त्या दुचाकीवरून माजलगावकडे जात होत्या. नित्रुडजवळ खड्ड्यांमुळे त्या दुचाकीवरून खाली पडल्या. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. मुलाने त्यांना उपचारासाठी बीडमधील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथून एका खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. अधिक उपचारासाठी शहरातील दुनाखे रुग्णालयात आणण्यात आले. येथील डॉक्टरांनी त्यांना ब्रेन डेड घोषित केले. डॉक्टरांनी नातेवाईकांना अवयवदानाविषयी माहिती दिली. माणिक हॉस्पिटलमध्ये मंगळवारी सायंकाळी अवयवदानाची प्रक्रिया पार पडली. त्यांचे यकृत मुंबईतील रुग्णासाठी विमानाने पाठविण्यात आले. कमलनयन बजाज, सिग्मा हॉस्पिटलमधील रुग्णांना किडनी दिली. त्यांचे नेत्र संकलनही करण्यात आले. अवयवदानासाठी डॉ. मिलिंद दुनाखे, डॉ. शरद बिरादार, डॉ. महेश जोशी, डॉ. अभय महाजन, डॉ.भास्कर मुसांडे, डॉ. समिध पटेल, डॉ. मकरंद कांजाळकर, डॉ. उल्हास कोंडपल्ले, डॉ. राजेंद्र प्रधान, डॉ. प्रशांत एस. राव, डॉ. स्वप्नील शर्मा, समन्वय समितीचे डॉ. सुधीर कुलकर्णी, मनोज गाडेकर, अनिल झाल्टे यांनी परिश्रम घेतले.
अंगणवाडी शिक्षिकेचे अवयवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 01:06 IST