उस्मानाबाद : निवडणुका न झालेल्या सोसायट्यांचे अपात्र ठरविलेले ‘ते’ ठराव कायम करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत़ तीन याचिकाकर्त्यांना त्यामुळे दिलासा मिळाला आहे़ जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी मतदार यादी प्रसिध्द करण्याच्या प्रक्रियेवेळी बीड येथील एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने ज्या सोसायट्यांची निवडणूक वेळेत झालेली नाही, त्या सोसायट्या निवडणूक प्रक्रियेत सहभाग घेण्यासाठी सक्षम नसल्याचे सांगत, असे ठराव अपात्र करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या़ यावरून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील अशा २१५ ठरावांना अपात्र ठरविले होते़ त्यानंतर अपात्र ठरलेले बसवराज सरणे, लक्ष्मण मुनाळे, काकासाहेब पाटील आदींनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती़ त्यावेळी याबाबत सोसायट्यांना पूर्वसूचना दिलेली नव्हती, गतवर्षी दुष्काळी स्थितीमुळेच शासनाने निवडणुकीला मुदतवाढ दिली होती़ निवडणूक घेण्याचे काम प्रशासनाचे असल्याने सोसायट्यांची यामध्ये काही चूक नाही, आदी विविध कारणे देत बाजू मांडली होती़ याचिकाकर्त्यांची बाजू ऐकूण घेत वकिलांनी केलेला युक्तीवाद ऐकूण न्यायालयाने याचिकाकर्त्यांचे ठराव कायम करण्याचे आदेश दिल्याचे वृत्त आहे़ त्यामुळे या तिघांना दिलासा मिळाला आहे़
‘ते’ ठराव कायम करण्याचे आदेश
By admin | Updated: March 31, 2015 00:36 IST