औरंगाबाद : मे. तुलसी एस्ट्रुजन्स लि. चे संचालक आणि जामीनदार संजय टपारिया आणि प्रदीप मुंदडा तसेच जामीनदार नंदिनी टपारिया या तिघांनी न्यायाधिकरणाच्या पूर्वपरवानगीशिवाय देश सोडून जाऊ नये, अशा आशयाचा आदेश येथील ऋण वसुली न्यायाधिकरणाचे पीठासीन अधिकारी रमेशकुमार महालियान यांनी नुकताच दिला आहे. प्रस्तुत प्रकरणात १९९ कोटी रुपयांपेक्षा जादा रक्कम अडकली आहे. ते पैसे ठेवीदारांचे आहेत. पंजाब नॅशनल बँकेतर्फे अॅड. श्रीकांत अदवंत यांनी न्यायाधिकरणाच्या निदर्शनास आणून दिले की, प्रतिवादी कंपनीकडे जवळपास २०० कोटी रुपये थकीत आहेत. प्रतिवादींनी हे मान्य केले आहे की, प्रदीप मुंदडा हे त्यांच्या कुटुंबासह दक्षिण आफ्रिकेत स्थायिक झाले असून तेथे नोकरी करतात. वरील तिघेही कंपनीच्या कर्जासाठी जामीनदार आहेत. शिवाय संजय टपारिया आणि प्रदीप मुंदडा हे कंपनीचे संचालकसुद्धा आहेत. वरील तिघे देश सोडून जाणार असल्याची माहिती आहे. ते देश सोडून गेल्यास अर्जदार बँक त्यांच्याकडील कर्जाची वसुली करू शकणार नाहीत. प्रतिवादींतर्फे मुखत्यार सी.डी. मिश्रा यांच्या वतीने उत्तर दाखल केले. त्यात म्हटल्यानुसार अर्जदार बँकेने प्रतिवादींवर दबाव टाकण्यासाठी आणि त्यांचे वैयक्तिक स्वातंत्र्य हिरावून घेण्यासाठी मूळ अर्ज दाखल केला आहे. टपारिया दाम्पत्य औरंगाबादेतच स्थायिक आहे, तर मुंदडा जरी दक्षिण आफ्रिकेत स्थायिक झालेले असले तरी ते वारंवार भारतात येतात.
परवानगीशिवाय देश सोडून न जाण्याचा आदेश
By admin | Updated: May 3, 2016 01:09 IST