फुलंब्री : बोरगाव अर्ज परिसरात अनेक ठिकाणी फ्यूज नसलेले ट्रान्स्फॉर्मर उघडे पडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.
बोरगाव अर्ज सर्कलमध्ये महावितरणचे वीस कर्मचारी कार्यरत आहेत. त्या सर्वांची ड्युटीही दिवसा असते. दिवसा वीजप्रवाह खंडित झाला तर त्याची दुरुस्ती केली जाते. परंतु रात्रीच्या वेळेला रोहित्रात बिघाड झाल्यास दुरुस्ती कोणी करायची असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यात शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळीच पिकांना पाणी द्यावे लागते. अशावेळी वीजपुरवठा खंडित झाला तर शेतकऱ्यांना थेट घरचा रस्ता धरावा लागतो.
पाण्यात हिस्सेदार आणि विजेचा खोळंबा
विहिरींना यंदा भरपूर पाणी आहे. त्यात विहिरीच्या पाण्यात हिस्सेदार असतात. त्यामुळे पिकाला पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असते. त्यात वीजपुरवठा खंडित झाला तर पाणी देण्याचे नियोजन बिघडले जाते. विशेष करून महावितरणकडून रात्रीच्या वेळेला वीजपुरवठा दिला जातो. त्यातही वीजपुरवठा खंडित झाला तर काहीच उपयोग होत नाही. त्यात जागोजागी उघडे व फ्यूज नसलेल्या ट्रान्स्फॉर्मरची संख्या जास्त असल्याने रात्रीच्या वेळी किरकोळ स्फोट झाल्यास शेतवस्तीवरील शेतकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. गट क्रमांक २५६ मधील चंद्रे यांच्या शेतातील ट्रान्स्फॉर्मर नादुरुस्त असून गेल्या पाच दिवसांपासून ते खोलून एका ओट्यावर आणून ठेवलेला आहे. अद्यापही त्याची दुरुस्ती केली जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
फोटो : बोरगाव अर्ज