औरंगाबाद : समाजात वावरणाऱ्या अत्यंत गोरगरीब नागरिकांचे अक्षरश: शोषण राजकीय पक्षांकडून सुरू आहे. आपली वोट बँक मजबूत करण्यासाठी काहीजण अत्यंत खालच्या पातळीवरही जात आहेत. स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत देशातील मुस्लिम बांधवांना त्यांचा हक्क देण्यात आला नाही, असे मत मौलाना अहमद हसन कासमी यांनी व्यक्त केले.आॅल इंडिया इमाम कौन्सिलतर्फे नेहरू भवन येथे नुकतेच ‘इत्तेहाद मोहीम’या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना कासमी पुढे म्हणाले की, भारतीय संविधान बदलण्याचा विचार करणाऱ्यांपासून मुस्लिम समाजाला अधिक धोका आहे. आज देशातील मुस्लिमांविरुद्ध षड्यंत्र रचण्यात येत आहे. इस्लाम धर्म शांतीचा संदेश देतो. मानवतेला कोणत्या धर्मापासून धोका नाही, राजकीय मंडळींपासूनच मोठा धोका आहे. मुस्लिम बांधवांनी वेळीच हे मनसुबे ओळखून वागायला हवे. आपला कोणी राजकीय वापर तर करून घेत नाही, हे सुद्धा बघितले पाहिजे. मौलाना इलियास फलाही यांनी इस्लामची जीवन व्यवस्था यावर मार्गदर्शन केले. सचिव मौलाना अब्दुल रहेमान नदवी, मौलाना मोईज फारुकी, मौलाना शमसोद्दीन सैफी, मौलाना अब्दुल कवी फलाही, मौलाना अब्दुल कय्युम नदवी, मौलाना सादीक नदवी, मौलाना अब्दुल समी नदवी यांनीही कार्यक्रमात मार्गदर्शन केले.
राजकीय पक्षांकडून फक्त शोषण
By admin | Updated: April 20, 2016 00:22 IST