लातूर : जिल्ह्यातील विविध सहकारी संस्था अपडेट करण्याच्या अनुषंगाने सहकार विभागाने सहकारी संस्था आॅनलाईन करण्याचा निर्णय घेतला होता़ त्यानुसार जिल्ह्यात सहकारी संस्थांची माहिती आॅनलाईन करण्याची प्रक्रिया सुरु झाली़ मात्र, गेल्या सहा महिन्यात अर्ध्याच संस्थांनी ही माहिती आॅनलाईन केली आहे़ अजून जवळपास २ हजार संस्था अपडेट होण्याकडे दुर्लक्षच करीत आहेत़सर्वच क्षेत्र संगणकीकृत होत असताना थेट शेतकरी, दुग्ध उत्पादकांशी संबंधित असलेल्या सहकारी संस्था मात्र कात टाकण्याचे नाव घेईनात़ म्हणूनच शासनाच्या सहकार विभागाने यासंदर्भात निर्णय घेऊन सर्व सहकारी संस्था आॅनलाईन करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत़ परंतु, गेल्या सहा महिन्यांपासून याबाबत प्रयत्न केले जात असतानाही सहकारी संस्था मात्र अजूनही ढिम्मच असल्याचे दिसून येत आहे़ जिल्ह्यात ४०४१ सहकारी संस्था आहेत़ त्यापैकी ९७० दुग्ध व मत्स्य व्यवसायाशी संबंधित आहेत़ या सहकारी संस्थांना वेळोवळी संस्थेची माहिती एकत्र करुन ती आॅनलाईन टाकण्याची सूचना करुनही अर्ध्या संस्थांनी त्याकडे कानाडोळा केला आहे़ जवळपास गेल्या सहा महिन्यांपासून ही प्रक्रिया सुरु असताना जिल्हाभरातून आतापर्यंत २०७६ सहकारी संस्थानीच माहिती आॅनलाईन अपडेट केली आहे़ उर्वरीत १९६५ सहकारी संस्थांनी आपली माहिती अद्याप अपलोड केली नाही़ विशेष म्हणजे याबाबतीत दुग्ध व मत्स्य व्यवसायाशी संबंधित संस्थांची अधिक उदासीनता दिसून येते़ ९७० पैकी केवळ ५७ संस्थांनीच आपली माहिती आॅनलाईन अपलोड केली आहे़हायटेक वाटचालीत स्पीडब्रेकऱ़़ शासन हळुहळु सर्वच विभाग संगणकीकृत करण्याचा प्रयत्न करीत आहे़ त्याअंतर्गत सहकार विभागानेही त्यांच्या अखत्यारीत असलेल्या सहकारी संस्था संगणकीकृत करुन अपडेट होण्यासाठी प्रयत्नरत आहे़ संस्थेचे सभासद, भागभांडवल यासह संस्थेची संपूर्ण माहिती आॅनलाईन करण्याचे नियोजन आहे़ भविष्यात शेतकऱ्यांनाही तंत्रज्ञानाच्या माध्यमातून संस्ेिकडील कामे सुकर व्हावीत, यासाठी प्रयत्न सुरु असताना अद्याप अर्ध्या संस्थांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे़
सहकारी संस्था होईनात आॅनलाईन
By admin | Updated: August 4, 2014 00:52 IST