गारज : वैजापूर तालुक्यातील गारज, बाभूळगाव, मनूर, भोकरगाव, पोखरी, भायगाव, पाथ्री आदी परिसरातील शेतकर्यांच्या मोठ्या प्रमाणावर कांद्याच्या चाळी सडत आहेत. त्यामुळे ऐन शेतीच्या कामाच्या तोंडावर बळीराजा आर्थिक अडचणीत सापडला आहे. या अगोदार गारपीट व अवकाळी पावसाने गहू, हरभरा, ज्वारी व फळबाग हातचे गेल्यामुळे शेतकरी पूर्णपणे हवालदिल होऊन कर्जबाजारी झाला. त्यातच या परिसरातील शेतकरी सरकारी अनुदानापासून वंचित राहिला आहे. त्यामुळे संसाराचा गाडा कसा ओढावा, या चिंतेत शेतकरी बुडाला आहे. त्यातच काही शेतकर्यांच्या मुलीचे लग्न या आपत्तीमुळे संकटात आले आहे. पीक खराब होत असल्यामुळे ते नियंत्रणात आणण्यासाठी काय उपाययोजना करता येईल, याचे मार्गदर्शन कृषी विभागामार्फत व्हावे, अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे. लागवडीकरिता एकरी २५ ते ३० हजार रुपये खर्च आला. लागवडीपासून ते काढणीपर्यंत ८० हजार खर्च झाले. शासनाने कांदा चाळीचे पंचनामे करून मदत द्यावी, अशी मागणी आसाराम सरोवर, गोरख तुपे, शहादू राऊत, अण्णा तुपे, किरण सुभाष सरोवर, नारायण तुपे, शिवाजी सरोवर आदींनी केले. याबाबत कृषी अधिकारी व्ही.एल. नरवडे यांना विचारले असता ते म्हणाले की, गारपिटीने पातीला बुरशी लागली तर कांदा खराब होण्याची शक्यता असते. (वार्ताहर)
वैजापूर तालुक्यात कांदा सडला
By admin | Updated: May 8, 2014 00:24 IST