औरंगाबाद : मनपाने मागील महिन्यात प्रायोगिक तत्त्वावर ११ वॉर्डांना दररोज पाणी देण्याचा प्रयोग सुरू केला होता. हा प्रयोग सोमवार, दि. २१ मार्चपासून बंद करण्यात येणार असल्याचे औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीने जाहीर केले.शहरातील नागरिकांना दररोज पाणी देण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले होते. जायकवाडीतून अतिरिक्त पाणी न घेता आहे त्याच पाण्याचे योग्य नियोजन करून दररोज पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. शहरात असंख्य लिकेज आहेत. हे लिकेज बंद करून पाणी देण्यात येणार असल्याचे घोषित करण्यात आले होते. या प्रयोगाला मनपातील अधिकाऱ्यांकडूनच जोरदार विरोध करण्यात येत होता. तत्कालीन आयुक्तांच्या दबावाखाली ११ वॉर्डांमध्ये प्रयोग सुरूही करण्यात आला. हळूहळू संपूर्ण शहरात ही योजना राबविण्याचे ठरले होते.शनिवारी औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीने दररोज पाणी देण्यास असमर्थता दर्शविली आहे. जायकवाडी धरणातील मृतसाठ्यातून पाण्याचा उपसा करण्यात येत आहे. धरणातील पाण्याची पातळी खालावल्याने अगोदरच उपसा कमी झाला आहे. त्यात दररोज पाणी देणे अशक्य असून, सोमवारपासून ११ वॉर्डांना पूर्वीप्रमाणेच म्हणजे दोन दिवसांआड पाणी देण्यात येईल.
एक दिवसाआड पाण्याचा ‘प्रयोग’ बंद
By admin | Updated: March 20, 2016 02:13 IST