उमरगा: लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर बलात्कार केल्याप्रकरणी युवकास उमरगा न्यायालयाने सात वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली़ याबाबत अतिरिक्त शासकीय अभियोक्ता अॅड़व्ही़एस़आळंगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, उमरगा शहरातील अझर सिझाउद्दीन शेख (वय-२८) याने घराशेजारी राहणार्या एका महिलेस लग्नाचे आमिष दाखवून तिच्या इच्छेविरूध्द शारीरिक संबंध प्रस्थापित केले़ यात ती महिला गर्भवती राहिल्यानंतर शेख याने गर्भपात कर अन्यथा लग्न करणार नाही, अशी धमकी देत तिचा गर्भपात केला़ गर्भपातानंतर त्याने तिच्याशी विवाह करण्यास नकार दिला़ याबाबत पीडित महिलेने १८ आॅगस्ट २००९ रोजी उमरगा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती़ या फिर्यादीवरून अझर शेख व त्यास मदत केल्यामुळे अफसर मुल्ला याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता़ तपासाधिकारी पोनि आऱएम़मोरे यांनी तपासांती उमरगा प्रथमवर्ग न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते़ यानंतर हा खटला उमरगा येथील सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आला़ न्यायाधीश एस़एल़पठाण यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली़ सुनावणीदरम्यान समोर आलेले पुरावे आणि अॅड़व्ही़एस़आळंगे यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून अझर शेख यास न्यायाधीश पठाण यांनी भादंवि कलम ३७६ अन्वये सात वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रूपये दंड, दंड न दिल्यास सहा महिने सक्तमजुरी अशी शिक्षा ठोठावत दंडाची रक्कम फिर्यादीस देण्याचे आदेश दिले़ तर दुसरा आरोपी अफसर मुल्ला यास सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्त करण्यात आले़ (वार्ताहर)
बलात्कार प्रकरणी एकास सक्तमुजरी
By admin | Updated: May 17, 2014 00:17 IST