बीड: रुढी, परंपरेनुसार आजही काही लोक देवाची भक्तिभावाने पूजा करतात. अशी शंभर वर्षांपासून चालत आलेली परंपरा वडवणी तालुक्यातील चिंचाळा येथील ग्रामस्थांनी जपली आहे. प्रत्येक वर्षी आषाढाच्या महिन्यात एका दिवशी येथे १५ बैलगाड्या ओढल्या जातात ही परंपरा आजही कायम आहे.वडवणी तालुक्यातील चिंचाळा येथे आईलक्ष्मीचे मंदिर आहे. या मंदिरात विविध कार्यक्रम घेतले जातात. असाच एक कार्यक्रम आषाढाच्या महिन्यात घेतला जातो. या कार्यक्रमासाठी जिल्ह्यासह परजिल्ह्यातून नागरिक येत असतात. गावापासून अर्ध्या कि.मी. अंतरावर असलेल्या आईच्या दर्शनासाठी भाविकांची सकाळपासूनच गर्दी होते. यामध्ये महिला, तरुण यांचाही मोठ्या संख्येने सहभाग असतो. शंभर वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा आजही मोठ्या भक्तिभावाने जपली जात असल्याचे येथील सरपंच बळीराम आजबे यांनी सांगितले.सकाळपासूनच भाविक बैलगाड्या जमा करण्यासाठी गावामध्ये फिरत असतात. सायंकाळी ४ वाजेपर्यंत १५ गाड्या तयार केल्या जातात व साखळी पद्धतीने बांधल्या जातात. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास गावापासून आईच्या मंदिरापर्यंत भाविक या गाड्या ओढतात. हे पाहण्यासाठी पूर्ण गाव जमा होते. बाहेरुन आलेल्या भाविकांची जेवणाचीही सोय केली जाते. ही परंपरा पुढेही जपली जाईल, असे सरपंच आजबे यांनी सांगितले. हा कार्यक्रम पाहण्यासाठी महिला, लहान मुले हे मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात. (वार्ताहर)
शंभर वर्षांची परंपरा आजही कायम
By admin | Updated: July 16, 2014 01:24 IST