औरंगाबाद: धुलिवंदननिमित्त रंग खेळताना मित्रांसोबत एकच 'प्याला' घेतल्यानंतर त्या दोघी तर्रर झाल्या आणि त्यांचे स्वत:वरील नियंत्रण सुटले. या मुलींना त्यांच्या मित्रांनी पडेगाव येथील शेळी-मेंढी प्रशिक्षण केंद्राच्या आवारात एका झाडाखाली टाकले, त्यावेळी वाहतुक पोलीस त्यांचा पाठलाग करून तेथेपर्यंत पोहचताच मैत्रिणींना सोडून ते सहा मित्र पसार झाले. यानंतर पोलिसांनी त्यांना तातडीने घाटीत दाखल केल्याने त्यांचे प्राण वाचले. ही घटना शुक्रवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली.
प्राप्त माहिती अशी की, छावणी वाहतुक शाखेचे निरीक्षक रामेश्वर रोडगे आणि कर्मचारी शुक्रवारी सकाळी साडेअकरा ते बारा वाजेच्या सुमारास छावणीकडून दौलताबाद टी. पॉर्इंटकडे जात होते. यावेळी त्यांना दोन दुचाकीवर ट्रिपलसीट जाणारे सहा जण दिसले. रंग खेळल्यामुळे सर्वांची चेहरे ओळखू येत नव्हते. यामुळे पोलिसांनी सुरवातीला त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. पोलिसांची गाडी पाहुन दुचाकीस्वारांनी त्यांच्या मोटारसायकली पडेगाव येथील शेळी-मेंढी प्रशिक्षण केंद्राजवळील शेतात नेली. तेथे त्यांनी दुचाकीवरील त्यांच्या मैत्रिणींना उचलून खाली ठेवले. त्यावेळी पो.नि. रोडगे यांना संशय आल्याने त्यांनी गाडी वळवून दुचाकीस्वारांच्या दिशेने नेली. पोलिसांना पाहुन ते मैत्रिणींना तेथेच सोडून पसार झाले. पोलिसांनी तेथे जाऊन पाहिले असता जिन्स पॅण्ट आणि टॉप्स घातलल्या मुली दारूच्या नशेत तर्रर होऊन बेशुद्ध पडल्या आहेत. यानंतर छावणी पोलिसांना बोलावून दोन्ही मुलींना तातडीने घाटी रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे त्या मुलींचे प्राण वाचले. त्यांची ओळख पटली असून त्यांचा जबाब शनिवारी सायंकाळपर्यंत पोलिसांना घेता आला नव्हता.
मित्रांसोबत पहिलाच प्याला पडला महागातदोन्ही मैत्रिणी एका महाविद्यालयात प्रथम वर्षात शिकत आहेत. त्यांच्या मित्रांच्या आग्रहाखातर त्यांनी दारूचा एकच प्याला घेतला अन त्या नशेत तर्रर झाल्या. नशा एवढी चढली की, त्यांना नीट उभे राहता येत नव्हते आणि बोलताही येत नव्हते. पडेगाव येथे त्यांचे घर असल्याने अशा अवस्थेत त्यांना घरी सोडणे शक्य नसल्याने मित्रांनी त्यांना पडेगाव येथील एका लिंबाच्या झाडाखाली सोडले. या झाडापासून अवघ्या ५० फुटावर विहिर आहे. पोलिसांनी वेळीच मदत केल्याने दोन्ही मुली सुखरूप राहिल्या.